पहिल्या टप्प्यात 67 गावे कॅशलेस करण्याचा निर्धार ----जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक:- 16/12/2016                                                                                                               वृत्त क्र. 804
 पहिल्या टप्प्यात 67 गावे कॅशलेस करण्याचा निर्धार
                                                                        ----जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

अलिबाग दि.16 :- (जिमाका) आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार कॅशलेस  करावे. रायगड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकूण 67 गावे कॅशलेस करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्धार असून यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांनी तसेच बँकांनी योग्य नियोजन करावे अशा सूचना  जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या.
जिल्ह्यात कॅशलेस आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी.   कॅशलेस गावे करण्यासाठी निवडलेल्या गावात केलेल्या कार्यवाही संदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.   या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  लिड बँकेचे व्यवस्थापक टी.मधुसूदन तसेच जिल्ह्यातील  प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि बँकाचे प्रतिनिधी,विविध विभागाचे वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, पहिल्या टप्प्यात 67 गावे कॅशलेस करण्यासाठी निवडली आहेत.    यामध्ये प्रांताधिकारी 8, तहसिलदार 15, गटविकास अधिकारी 15 व जिल्ह्यातील बँका 29 अशी  एकूण 67 गावे कॅशलेस करण्याचे नियोजन आहे.   या गावात येत्या 26 डिसेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत.  या ग्रामसभेत नागरिकांना कॅशलेस व्यवहार कसे करता येतील, त्यात कोणते पर्याय निवडता येतील याची माहिती द्यावी.     जनतेला यावेळी कॅशलेस व्यवहाराची प्रात्यक्षिक करुन त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करावी.    या ग्रामसभेत बँक खाती उघडण्यासाठी आवश्यक फॉर्म त्याचवेळी भरुन घ्यावेत. घरातील किमान एका व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.   प्रत्येक खातेदाराला रुपी कार्ड देऊन ते ॲक्टीवेट करुन द्यावेत.  कॅशलेस व्यवहारातील लोकांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण होईल याचा प्रयत्न करावा.  बँकांनी व्यापारी,दुकानदार तसेच संस्थांना कार्ड स्वाईप मशिन उपलब्ध करुन द्यावेत अशा सूचनाही त्यांनी  यावेळी दिल्या. 
विद्यार्थ्यांचा सहभाग
नियोजित ग्रामसभेत महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन त्यांच्या मार्फतही कॅशलेस व्यवहारात जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचे  काम करावे.  त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांचा सहभाग झाल्यास  ते घरातील नागरिकांना याबाबत समाजावून सांगू शकतील.   या माध्यमातून पहिल्या टप्प्यात निवडलेली गावे कॅशलेस होण्यास मदत होईल.  नागरिकांनी पुढील पाच डिजिटल पध्दतीचा वापर करावा.
डिजिटल लाईज पध्दतीचे पाच मार्ग
1)यूपीआय :  या पध्दतीत आपला मोबाईल क्रमांक बँक अथवा एटीएम  मध्ये नोंदवा.   संबंधित बँकेचे ॲप डाऊनलोड करा.  आपला आयडी तयार करा.  आपला पिन  नंबर सेट करा.  यानंतर आपण कोठूनही आपली आर्थिक देवाणघेवाण करु शकतात.    2)युएसएसडी :  आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करा.  आपल्या फोन वरुन *99# डायल करा.  आपल्या बँकेचे नाव भरा (फक्त पहिली तीन आद्याक्षरे) किंवा आयएफएससी कोडची पहिली चार अक्षरे , फंड ट्रान्स्फर-MMID  हा ऑप्शन निवडा.  ज्यांच्याशी व्यवहार करावयाचा आहे त्यांचा  मोबाईल नंबर आणि MMID  टाका, द्यावयाची रक्कम आणि MPIN स्पेस आणि खाते नंबरचे शेवटचे चार अंक भरा.  यानंतर आपण आर्थिक  देवाणघेवाण  करु शकतात.     3)ई वॅलेट : एसबीआय बडी प्रमाणे वॅलेट डाऊन लोड करा.  आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा.  त्याला आपल्या डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिगशी लिंक करा. आता तुमचा फोन  हेच तुमचे  वॅलेट अर्थात पैशाचे पाकीट झाले आहे.    4)कार्डस : आपली आर्थिक देयके आपल्या प्रिपेड, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करा.  आपले कार्ड स्वाईप करा. आपला पिन नंबर टाका,पावती घ्या.   5) आधार संलग्न पेमेंट पध्दती : आपले आधार कार्ड  हे आपल्या बँक खात्याशी संलग्न करा.  आपण आपली देवाणघेवाण खात्यावरील शिलकेची चौकशी,पैसे जमा करणे,काढणे,एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर पाठविणे हे सर्व व्यवहार करु शकता. याबाबतची माहिती जिल्ह्याच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली असल्याचेही  जिल्हाधिकारी यांनी  सांगितले.
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज