अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये मागील वर्षभरात घट
रायगड , दि.22(जिमाका): अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वनविभागामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे यंदाच्या वर्षात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. विभागीय कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामुळे याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अलिबाग उपवनसंरक्षक श्री.राहुल पाटील यांनी दिली. अलिबाग वनविभागाचे निव्वळ क्षेत्र 1074.63 चौ.कि.मी. इतके आहे. मार्च 2023 ते फेब्रुवारी 2024 या मागील वर्षभरात अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात एकूण 155 वणव्यांच्या घटना घडल्या असून 286.984 हेक्टर वनजमिनीचे नुकसान झाले आहे. आग मुख्यतः ग्राउंड फायर स्वरुपातील असल्यामुळे जंगल नष्ट होत नसून जैवविविधतेला धोका पोहचत नाही तसेच जंगलातील आगीमुळे वनस्पतीचे व काजू बागायतींचे नुकसान निदर्शनास आलेले नाही . अनेक ठिकाणी वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग , राज्य महामार्ग , जिल्हा मार्ग असे विविध रस्ते आहेत. वनकर्मचारी वणवा लागल्याचे निदर्शनास येताच तो तात्काळ विझविण्याकाम...