शून्य दुर्घटना आणि पर्यटन वृद्धीचा 'प्रबळगड पॅटर्न'

अलिबाग, जि. रायगड, दि.1 (डॉ. मिलिंद दुसाने)- रायगड जिल्हा पर्यटनाचे उर्जावान केंद्र आहेच. पर्यटन वृद्धीच्या अनेक संधी या ठिकाणी आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन विविध प्रयत्न करीत आहे. पर्यटन वृद्धी सोबत हे पर्यटन सुरक्षित व सुकर होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबविलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. सुरक्षित आणि सुकर पर्यटनाचा हा प्रयोग त्यांनी प्रबळगड येथे राबविला. त्याचे परिणाम आता समोर आले असून आता हा सुरक्षित पर्यटनाचा 'प्रबळगड पॅटर्न' म्हणून समोर येत आहे. प्रबळगड हे पनवेल तालुक्यातील साहसी पर्यटकांचे 'हॉट डेस्टिनेशन'. या ठिकाणी ट्रेकिंग साठी जाणाऱ्या साहसी युवकांची संख्या खूप अधिक. अनेकदा पर्यटक दिशाभ्रमित होऊन हरवल्याच्या घटनाही पूर्वी घडल्या. नंतर प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने पर्यटकांना हुडकून सुरक्षित स्थळी आणावे लागल्याचे अनेक प्रसंगही सांगता येतील. तथापि, हा धोका ओळखून...