सुरु असलेल्या कंपन्यांनी काम नसलेल्या कामगारांना माणुसकीच्या भावनेतून तात्पुरत्या स्वरूपात काम द्यावे--जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी
अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका): जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला आहे. करोन विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत. जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या इतर भागातून व अन्य राज्यांमधून कामानिमित्त आलेले कामगार आहेत त्यातील काही कामगार संचारबंदी लागू होण्यापूर्वी आपल्या मूळ गावी परत गेले आहेत. परंतु काही कामगार हे जिल्ह्यात अडकून पडलेले आहेत. ...