सुयोग्य बदलासह पीक स्पर्धा खरीप हंगाम 2021 साठी नव्याने स्पर्धा जाहीर शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकासाठी दि.31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकासाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन
अलिबाग,जि.रायगड, दि.28 (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्याचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने स्पर्धा राबविण्यात आहे. सध्याच्या पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत :- पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी). तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण 11 पिके आहेत.