जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना दिले जाणार रॅपिड ॲटिजेन चाचणी प्रशिक्षण

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- जिल्ह्यात करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढील कालावधीत करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, याचा संसर्ग विशेषतः लहान मुलांमध्ये होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना रॅपिड अँटीजेन चाचणी प्रशिक्षण व करोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना दिले आहेत.

            ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. जिल्हयात सद्य:स्थितीत 1 हजार 727 आशा स्वयंसेविका कार्यरत असून, त्यांच्यामार्फत मागील वर्षात जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये व्यापक जनजागृती करून प्राथमिक तपासणीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. कोविड विषाणूचा ग्रामीण भागात होणारा प्रसार थोपविण्यासाठी मोठया प्रमाणावर कोविड चाचणी व लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविकाना रॅपिड अँटीजेन चाचणी प्रशिक्षण व करोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

              ज्या गावात करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत, अशा गावात ग्रामसेवक, सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता गाव पातळीवर गठीत केलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने विशेष चाचणी कॅम्प व लसीकरण कॅम्पचे आयोजन करावे व जिल्ह्यातील सर्व गावे कोविड मुक्त ठेवण्याचा प्रयत्न कसोशीने करावा, असेही डॉ. किरण पाटील यांनी आवाहन केले आहे.

              यानुषंगाने तालुका अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या अखत्यारीतील आशा सेविकांना रॅपिड अँटीजेन चाचणी प्रशिक्षण द्यावे, तसेच प्रत्येक आशांना करोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्यात यावे, आशा स्वयंसेविकांनी गावातील ताप, खोकला, सर्दी सारखी कोविडची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांचा शोध घ्यावा व त्यांची तत्काळ अँटीजेन चाचणी करावी, ज्या नागरिकांची करोना टेस्ट पॉझिटीव्ह येईल त्यांची पूर्ण माहिती आशांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कळवावी, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना आशा स्वयंसेविककडून करोना पॉझिटीव्ह रुग्णांसंदर्भात जी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविली जाईल ती माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राकडून Cv Analytic या संकेतस्थळावर भरली जाईल याची प्रत्येक दिवशी शहानिशा करावी, जे नागरिक करोना पॉझिटीव्ह आलेले आहेत, त्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामधून त्यांच्या रक्तांचे नमुने घेऊन चाचणी करावी व तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये भरती होण्याच्या सूचना द्याव्यात, आशा सेविकांनी आपल्या मोबाईलमध्ये ई-संजीवनी ॲप डाऊनलोड करून आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्णांना ॲपच्या लिंकद्वारे तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेण्यासाठी मदत करावी, तसेच कोविड-19 मुळे प्रभावित मुलांना संवेदना मार्फत दूरध्वनीवरून मोफत समुपदेशन पुरवले जाते, त्याचा टोल फ्री क्रमांक 1800-121-2830 असून सोमवार ते शनिवार सकाळी 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत मोफत समुपदेशन केले जाते, याबाबत आशा सेविकांनी जनजागृती करावी, ज्या रुग्णांची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आलेली आहे.परंतु  करोनाची ताप, खोकला, सर्दी इत्यादी लक्षणे आढणाऱ्या सर्व रुग्णांनी संबंधित तालुका स्तरावरील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय स्तरावर जाऊन आरटीसीपीआर चाचणी करण्याचा सल्ला देण्यात यावा, आरटीसीपीआर तपासणी करीता रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

            या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक