वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने दखल

रायगड-अलिबाग दि २: माणगाव येथील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांच्या वयोवृद्ध पत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांना व्यवस्थित निवृत्तीवेतन मिळत असून काल तहसीलदार प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे त्यांच्या माहेरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली व वैद्यकीय उपचार व इतर गोष्टींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी वीर पत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या एका बातमीच्या अनुषंगाने तहसीलदार आयरे यांना लक्ष्मीबाई यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना कुठल्या अडचणी येत आहेत याविषयी विचारणा करण्यास सांगितले होते. वीर पत्नी लक्ष्मीबाई या १०० वर्षांच्या आहेत. त्याप्रमाणे काल प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे जाऊन त्यांची व्यवस्थित विचारपूस केली व वैद्यकीय उपचार मिळत आहेत किंवा नाही ते पाहिले. सध्या त्यांच्यावर कौटुंबिक डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. लक्ष्मीबाई यांना स्मृतीभंशाचा आजार असून सध्याचे उपचार पुरेसे आणि योग्य आहेत असे त्यांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांनी सांगितले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार वीरप...