विशेष लेख:- *लोकनेता,लोकराजा, शोषितांचा, वंचितांचा आधारवड....राजर्षी छत्रपती शाहू महाराज.....!* *मानाचा त्रिवार मुजरा...!*
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासाला झळाळी देण्याचे काम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केले. त्यांनी लोकांचे स्वराज्य आणण्यासाठी केलेले धडाडीचे प्रयत्न आजही महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहिले जातात. समाजात असणाऱ्या व परंपरागत आलेल्या वाईट चालीरिती, परंपरा यांना छेद देण्याचे मौलिक कार्य त्यांनी केले. जनतेला समानता आणि स्वातंत्र्य मिळाले तर त्याचा उपभोग घेण्यासाठी व ते सर्व स्तरांवर राबविण्यासाठी सर्वप्रथम जनतेत पात्रता निर्माण करावयास हवी, या उद्देशाने प्रजाहितदक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक कार्याची नियोजनबद्ध बांधणी केली. छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाज, स्त्रिया, कष्टकरी, अस्पृश्य, शेतकरी यांच्याविषयी बहुमोल असे कार्य केले आहे. महाराजांना शिकारीचे प्रचंड वेड होते. कृषी क्षेत्राची जाण असणारा व शेतकऱ्यांची नस ओळखलेला राजा म्हणून त्यांची ख्याती होती. रात्रीच्या वेळी शिकारीसाठी जात असताना वाटेत भेटणार्या शेतकऱ्यांची, धनगरांची, फासेपारधी यांची आपुलकीने विचारपूस करून त्यां...