पर्यटक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22 - वर्षापर्यटन, गड किल्ले, वन भ्रमंती आणि गिर्यारोहणासाठी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी व होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पर्यटक सुरक्षा उपायांची यंत्रणेने अंमलबजावणी करावी, तसेच पर्यटनस्थळी व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी दिले. मान्सून पर्यटनाच्या काळात पर्यटक धबधबे, समुद्र किनारे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. उत्साहाच्या भरात पर्यटक नको त्या संकटात सापडून प्रसंगी प्राणाला मुकतात. अशा दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभय यावलकर यांच्या सह अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सीमा झावरे, उपवनसंरक्षक रोहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागरकुमार पाठ...