पर्यटक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22-  वर्षापर्यटन, गड किल्ले, वन भ्रमंती आणि  गिर्यारोहणासाठी जिल्ह्यात येणाऱ्या  पर्यटकांच्या सुरक्षेसाठी व होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पर्यटक सुरक्षा उपायांची यंत्रणेने अंमलबजावणी करावी,  तसेच पर्यटनस्थळी व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी दिले.
 मान्सून पर्यटनाच्या काळात पर्यटक धबधबे, समुद्र किनारे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. उत्साहाच्या भरात पर्यटक नको त्या संकटात सापडून प्रसंगी प्राणाला मुकतात. अशा दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभय यावलकर यांच्या सह अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क  विभाग सीमा झावरे, उपवनसंरक्षक रोहा,   जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागरकुमार पाठक आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळी  पोलीस विभाग, वन विभाग,  राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची संयुक्त पथके तयार करुन गस्त वाढविणे, धबधबे तसेच अन्य पर्यटन स्थळी मद्यपान करण्यास प्रतिबंध करणे यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग.पोलीस विभागाच्या सहयोगाने  अंमलबजावणी करेल. तसेच धबधबा व परिसरात मद्य विक्री व साठा करणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात येईल.  पर्यटन स्थळे व धबधबे यांच्या परिसरात  सुरक्षित अंतराव वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी  प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभाग आपापल्या कार्यक्षेत्रात अंमलबजावणी करेल. धबधब्यांच्या ठिकाणी  पर्यटकांना सावधगिरीचा इशारा देण्यासाठी चिन्हांकित माहिती फलक हे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी लावावेत, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधबा परिसरात तात्कालिन परिस्थितीचा विचार करुन  उपविभागीय अधिकारी जमाबंदीचे आदेश निर्गमित करतील. जिल्ह्यात प्रबळगड, ईशाळगड, पेठ किल्ला आदी ठिकाणी  ट्रेकिंग व साहसी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी संबंधित उपवनसंरक्षकांकडे आपली नाव नोंदणी करावी, त्यासाठी उपवनसंरक्षकांनी पर्यटकांना वन क्षेत्राच्या प्रवेश ठिकाणी नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. स्थानिक तरुणांना  गाईडचे प्रशिक्षण देऊन  पर्यटकांचा ट्रेकिंगसाठी गाईड नेणे बंधनकारक करावे जेणे करुन स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध होईल व  पर्यटक भरकटणार नाहीत, यासाठी उपविभागीय अधिकारी आणि उपवनसंरक्षक यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात  उपाययोजना करावी, तसेच धोक्याच्या ठिकाणी, जलाशये, समुद्र किनारे आदी ठिकाणी जीवरक्षक तयार करुन त्यांना पोषाख व ओळख पत्र देण्यात यावे अशा सुचना यावेळी जिल्हाधिकारी यावलकर यांनी केल्या.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास तसेच पर्यटन स्थळी व धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक