शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळा
शिवभक्तांना किल्ल्यावर अधिक
सुविधेसाठी प्रशासन प्रयत्नशील
                                                            - जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

 
अलिबाग दि.30, (जिमाका)- शिवराज्याभिषेक सोहळयासाठी 6 जून, रोजी रायगड किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात. त्यांची  गैरसोय होणार नाही  यासाठी रायगड जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी सांगितले. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह त्यांनी रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष पाहणी केली व  संबंधितांना मार्गदर्शन करुन सूचना दिल्या.
राज्याभिषेक सोहळयासाठी येणाऱ्या शिवभक्तांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह व्यवस्था, प्रथमोपचार सुविधा तसेच किल्ल्यावरील विद्युत व्यवस्था या बाबत उभयंतांनी किल्ला परिसरात पाहणी केली तसेच सोयी सुविधांबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्या ठिकाणी असलेल्या कोलिम तलाव, श्रीगोंदा टाकी या ठिकाणी भेट देऊन शिवराज्याभिषेक सोहळयासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यासंदर्भात चर्चा केली.
तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान
रायगड किल्ल्यावरील कुशावर्त, हत्ती व गंगासागर आदि तलावातील गाळ काढण्याची मोहिम गेल्या आठ दिवसापासून स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध शासकीय यंत्रणेमार्फत सुरु आहे. या  तलावात साचलेल्या गाळामुळे साधारणत: एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाई भासते. यातील गाळ काढण्याची मोहिम हाती घेतल्याने पाणी साठा वाढून पाणी टंचाईवर मात होईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.  गाळ काढण्याच्या या मोहिमेत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला आहे. दररोज 250 ते 300 सदस्य या ठिकाणी श्रमदान करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी व  जिल्हाधिकारी यांनीही आज श्रमदान करुन सहभाग नोंदविला. दोन दिवसापूर्वी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी देखील श्रमदान करुन मार्गदर्शन केले होते.
पाणी तलाव भूमिपूजन
रायगड किल्ला पायथा पाचाड या गावी जिजामाता समाधी स्थळाच्या जवळील तलावाचे मजबुतीकरण व त्या जवळील डफली तलावाचे खोलीकरण करुन तेथील पाणी साठा वाढावा व भविष्यातील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी विभागीय आयुक्तांच्या सुचनेनुसार जलयुक्‍त शिवार योजने अंतर्गत अनुक्रमे 34 व 27 लाख रुपये निधीची मंजूरी मिळाली असून त्याकामाचे विधीवत भूमीपूजन मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज करण्यात आले. हे काम जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात येत आहे.
यावेळी महाडचे प्रभारी प्रांत प्रविण पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.बी.तरकसे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम महाड व्ही.आर.सातपुते, प्रभारी तहसिलदार महाड सचिन गोसावी, गट विकास अधिकारी महाड श्री.मंडलिक, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. अरविंद तोरो, पुरातत्व विभागाचे अधिकारी, विद्युत महामंडळाचे अधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक यांनी ही श्रमदान केले.
0000000
 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत