चावडी वाचन कार्यक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र आयोजन --जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

चावडी वाचन कार्यक्रमाचे
जिल्ह्यात सर्वत्र आयोजन
                                          --जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर
अलिबाग,दि.03 (जिमाका):-महाराष्ट्र शासनाने 7/12 शुद्धीकरणाचा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून, त्यासाठी 15 मे,2017 पासून गावपातळीवर ग्रामसभा आयोजित करुन गा.न.नं.7/12 चावडी वाचनाचा कार्यक्रम राबविला जात आहे.जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांच्या निर्देशनानुसार रायगड जिल्हयात सर्वत्र चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.
गावातील तलाठ्यांकडून सर्वे गा.न.नं.7/12वरील व खाते उतारावरील कब्जेदारांचे, कुळांचे नावे व इतर तपशीलांचे वाचन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण 1974 गावामधून गा.न.नं.7/12 व 8 अ चे  वाचनाच्या ग्रामसभेस उपस्थित राहून आपला गा.न.नं.7/12 बरोबर आहे की नाही त्यावरील नावे,क्षेत्र,सर्व्हे नंबर व इतर अधिकारातील तपशील, वारस नोंदी, इत्यादी बाबींची शहानिशा गा.न.नं.7/12 वाचनावेळी करुन खात्री  करुन घ्यावी व काही  त्रुटी आढळल्यास तलाठ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.असे आवाहन करण्यांत येत आहे.
            आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांतून 105 गावांत  चावडी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या मधील तालुका निहाय आकडेवारी अलिबाग-37,पेण-24,मुरुड-3,पनवेल-4,तळा-3,म्हसळा-14,श्रीवर्धन-20,अशी आहे. ग्रामपातळीवर चावडी वाचन कार्यक्रमाचे नियोजन करतांना  चावडी वाचनाच्या तारखेबाबत दवंडी व नोटीस ग्राम पातळीवर तलाठ्याकडून देण्यात येतात त्याची माहिती संबंधित  तहसिल कार्यालयात उपलब्ध आहे. 
ग्रामस्थांनी नियोजनाप्रमाणे आपल्या गावी कोणत्या तारखेस चावडीवाचनाचा कार्यक्रम आहे. हे पाहून ग्रामसभेस उपस्थित राहणेचे आवाहन करण्यात येत आहे. गा.न.नं.7/12  व 8अ  मध्ये त्रुटी आढळल्यास व ग्रामसस्थांनी निदर्शनास आणून दिल्यास त्याची दुरुस्ती कालबद्ध कार्यक्रमात करण्यात येणार आहे.तसेच नागरिक आपला गा.न.नं.7/12 मोबाईल ॲप, महा ई-सेवा केंद्र, सायबर कॅफे, महा भूअभिलेख संकेतस्थळावर पाहू शकतात व त्यात त्रुटी आढळल्यास तलाठ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.
            याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांचेमार्फत सर्व शेतकरी व नागरिकांना पुनश्च: आवाहन करण्यात येत आहे की, गा.न.नं.7/12  शुद्धीकरण मोहिमेच्या चावडी वाचन कार्यक्रमाच्या ग्रामसभेस सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपला 7/12 शुद्ध असल्याची खात्री करावी व शासनाच्या महत्वकांक्षी कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत