स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्पांतर्गत नांगरवाडी, भोनंग येथे भात लागवड प्रात्यक्षिक


        अलिबाग दि.15,(जिमाका):- महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प जिल्ह्यातील अलिबाग, पेण, खालापूर, माणगांव या चार तालुक्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत  सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर  भात पिक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम नुकताच (दि.14) नांगरवाडी व भोनंग येथे पार पडला.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प या प्रकल्पांतर्गत प्रकल्प कार्यक्षेत्रात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 9 शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झाली आहे. या प्रकल्पांतर्गत खरीप हंगाम 2017 साठी एकूण 7 शेतकरी उत्पादक कंपन्यांना पी.पी.पी.( सार्वजनिक - खाजगी सहभागीता)  तत्त्वावर भाताचे 333 भात पिक प्रात्यक्षिके 133 हे.क्षेत्रावर घेण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कर्जत-5, वाय.एस.आर., सुवर्णा, कोलम, एम.टी.यु.-1010, गंगोत्री, सुवर्णा इ.वाणांची निवड करण्यात आलेली आहे. बजाज राईस मिल सिंधूदुर्ग या खरेदी कंपनीबरोबर सदर पीक प्रात्यक्षिकातून उत्पादित होणारा भात खरेदी करण्याबाबत करार करण्यात आलेला आहे.
अलिबाग तालुक्यात धाविरेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी रामराज, ता.अलिबाग या शेतकरी उत्पादक कंपनीमधील प्रात्यक्षिकांच्या लाभार्थ्यांनी भात लागवडीस सुरुवात केली आहे. त्यांनी सुवर्णा जातीचे बियाणे 29.60 हे.क्षेत्रावर वापरले आहे. प्रात्यक्षिकांमध्ये गिरीपुष्पपाल्याचा वापर करुन नियंत्रीतरित्या 20/15 से.मी. अंतरावर चारसुत्री पध्दतीने लागवड करण्यात आली. तसेच बांधावर गिरीपुष्पाचे स्टंप व तुर लागवड करण्यात आली. त्या अनुषंगाने नांगरवाडी व भोनंग येथे लागवड प्रात्यक्षिक पार पडले.
यावेळी आत्मा प्रकल्प संचालक मंगेश डावरे, यांनी गिरीपुष्प व तुर लागवडी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्प उपसंचालक डी.एस.चव्हाण यांनी चारसुत्री  पध्दतीने भात लागवड प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक करुन दाखविले व तांत्रिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास धाविरेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी रामराजच्या अध्यक्षा श्रीमती प्रमिला गावडे, संचालक मोहन धुमाळ, नंदकुमार बाबुराव गावडे, राजाराम मारोती झावरे, कृषि पणन तज्ञ टि.व्ही.शिंदे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पी.यु.पाटील, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक कल्पेश पाटील आदी. अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज