पत्रपरिषद कोकणातील सर्व ग्रामपंचायती व शाळांना वायफाय सुविधा- ना. गीते
अलिबाग दि.28, (जिमाका):- डिजीटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यासोबत कोकणातील सर्व ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेमार्फत
चालविल्या जाणाऱ्या शाळांना वायफाय
सुविधेने जोडले जात असून हे काम
प्रगतीपथावर आहे, अशी माहिती केंद्रीय
अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गीते यांनी आज येथे पत्रकारांना दिली.
येथील
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण
समिती अर्थात दिशा समितीच्या बैठक आज पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत
होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषदेचे अति.
मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण
पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल
जाधव, जि.प. सदस्य किशोर जैन आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना
ना. गीते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व
ग्रामपंचायती व शाळांना वायफायने जोडण्यात येणार आहे. त्यासाठी केबलिंगचे काम
पूर्ण होत आले असून अनेक
ग्रामपंचायतींपर्यंत वायफाय कनेक्टिव्हीटी मिळाली आहे. याकामाला अधिक गती
देण्यासाठी येत्या 3 ऑगस्टला दिल्ली येथे बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच सागरमाला
अंतर्गत रायगड जिल्ह्यातील धरमतल ते मुरुड
व कुंडलिका ते रेवदंडा हे जलमार्ग प्रस्तावित आहेत. त्यांचेही कामाला
सुरुवात होईल. जिल्ह्यात मनरेगाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतातील
बांधबंदिस्ती, कंपोस्ट खताचे खड्डे आदी कामांचाही योजनेत समावेश करण्यात आल्याची
माहिती त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील ग्रामिण भागातील विद्युतीकरणाला गती
देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती
योजनेअंतर्गत 129 कोटी रुपयांची कामे होत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
तसेच शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही
त्यांनी यावेळी केले.
०००००
Comments
Post a Comment