आरोग्यमंत्र्यांनी केली माथेरान येथील रुग्णालयाची पाहणी:आरोग्यसुविधेसाठी माथेरान मध्ये 'महाबळेश्वर पॅटर्न'- ना.डॉ. दीपक सावंत

         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-    माथेरानमधील आरोग्य सुविधेविषयी राज्य सरकार जागरूक आहे. उद्योजकांकडून सामाजिक सहायता निधी उभारून महाबळेश्वर मध्ये आरोग्य व्यवस्था प्रदान केली जात आहे त्याच पद्धतीने माथेरान मध्ये आरोग्य सुविधा देण्यात येतील. याठिकाणी दर 15 दिवसांनी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल. महाआरोग्य शिबिरासाठी औषधेही त्याच माध्यमातून उपलब्ध करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे  सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज माथेरान ता. कर्जत येथे केली.
           राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत  यांनी आज माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या दवाखान्याची पाहणी करुन  तेथील आरोग्य सुविधेविषयी माहिती घेतली.त्यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह माथेरान मधील सरकारी दवाखान्याची पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, प्रांताधिकारी दत्ता भडकवाड, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, तहसीलदार अविनाश कोष्टी, मुख्याधिकारी सागर घोलप, चंद्रकांत चौधरी, प्रसाद सावंत, प्रवीण सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माथेरान नगरपालिकेचे नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी आदींचीही उपस्थिती होती.
नगरपालिका रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर डॉ. सावंत म्हणाले की, शासन माथेरान नगरपालिकेच्या दवाखान्याचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करीत असून त्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा कालावधी मोठा असला तरी आजपासून राज्य सरकार माथेरान साठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देईल. उद्योगांच्या सामाजिक सहाय्यता निधीची उभारणी करुन  आरोग्य सुविधा पुरविल्या जातील.  त्या निधी मधून दर 15 दिवसांनी एक महाआरोग्य शिबीर आयोजित केले जाईल. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी सर्व आजारांवरील विशेषज्ज्ञ डॉक्टर हे माथेरानला येऊन बालके,  गरोदर माता, वृद्ध यांची तपासणी करतील आणि आवश्यकतेनुसार त्यांना जिल्ह्यात किंवा मुंबई अशा ठिकाणी गरजेनुसार उपचार दिले जातील. शिबिरात सर्व रुग्णांना औषध उपचार हा मोफत दिला जाईल आणि त्यांची पुढील उपचारासाठी नेण्याची व्यवस्था शासन करील, असेही ना. डॉ. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व प्राथमिक तपासण्या करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री तात्काळ खरेदी करण्याचे आदेश ना. डॉ. सावंत यांनी  यावेळी आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांना दिले.माथेरान मधील लोकांना आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून महाबळेश्वर पॅटर्न माथेरान मध्ये राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माथेरान  नगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश यादव, डॉ. उदय तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी के मोरे,यांनी ना. डॉ. सावंत यांना रुग्णालयाची माहिती दिली.
असा आहे महाबळेश्वर पॅटर्न
नगरपालिका असलेल्या महाबळेश्वर मधील आरोग्य सुविधा बाबत अनेक प्रश्न होते.अखेर राज्य शासनाने नियोजन केले.आता तेथे मुंबई पुण्यातील सहा तज्ज्ञ डॉक्टर आपल्या वेळेनुसार सेवा पुरवीत आहेत. तेथील लोकांनी सामाजिक सहाय्यता निधी उभारून त्याद्वारे औषधे खरेदी व डॉक्टरांचे मानधन  अदा केले जाते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक