किल्ले रायगड शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न





अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.06- किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला.   अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 
            सुरुवातीला छ.संभाजी राजे व युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे विधीवत पुजन करुन मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळयावर सुवर्ण मुद्रांचा  अभिषेक करण्यात आला.  तसेच आर्मी जवानांकडून बँण्ड पथकाद्वारे ध्वजारोहण व मानवंदना देण्यात आली.
            याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यसाय मंत्री महादेव जानकर, फिजीचे राजदूत रोंढीर कुमार, कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद छत्रे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, युवराज शहाजीराजे, पानीपतहून आलेले मराठा बांधव आदि उपस्थित होते.  
            शिवभक्तांना मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे यांनी सांगितले की, किल्ले रायगडची व्याप्ती व शिवरायांच्या रुजलेल्या विचारांमुळेच दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्य तसेच देशभरातील लाखो शिवभक्त शिवरायांना अभिवादन करण्यासाठी येथे आले.  छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते तर देशात व जगतात त्यांचे नावलौकीक आहे.  संपूर्ण जगात आपले नाव केवळ किल्ले रायगडामुळेच झाले आहे.  प्रत्येकाने किल्ले रायगडावर अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही  त्यांनी यावेळी उपस्थित शिवभक्तांना केले.  पुढील येणाऱ्या काळात किल्ले रायगडावरील फरसबंदी, 84 तलावांची सफाई तटबंदीची दुरुस्ती होऊन रायगडाचे देखणे रुप शिवभक्तांना पहायला मिळेल असेही ते म्हणाले.   छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा व त्यांची किर्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता ती सर्व जगात पोहचावी यासाठी सर्व देशाच्या राजदूतांना राज्याभिषेक सोहळयाचे निमंत्रण देण्यात आले होते.  त्याला प्रतिसाद देऊन फिजीचे राजदूत किल्ले रायगडावर आले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
            सन 2006 पासून अखंड परिश्रम व मेहनतीने छ.सभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा केला जात आहे.   त्याची व्याप्ती शिवभक्तांच्या प्रेमामुळे आज वाढली आहे असे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सावंत यांनी यावेळी सांगितले.
            प्रचंड जल्लोषात शिवराज्याभिषेकचा सोहळा रायगड किल्ल्यावर साजरा  झाला.  यात ढोल,ताशे यांचा गजर तसेच पारंपारिक पध्दतीने वेशपरिधान केलेले शिवभक्त आदिंचा उत्साह होता.  पहाटे 5.00 वाजता शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.   यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात झाले.  तसेच विविध मर्दानी खेळ, दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली.  

000 000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज