सहकारी संस्थांनी 31 जुलै पूर्वी लेखापरीक्षण अहवाल सादर करावे - जिल्हा उपनिबंधक खोडका
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका)दि.20- जिल्ह्यातील
सर्व सहकारी संस्थांनी 31 जुलै पर्यंत लेखापरीक्षण पूर्ण करुन अहवाल जिल्हा विशेष
लेखा परीक्षक कार्यालयास सादर करावेत असे आवाहन जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका यांनी
केले आहेत.
या संदर्भात जिल्हा
उपनिबंधक कार्यालयातून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्व सहकारी संस्थांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 75(1) मधील तरतुदीनुसार वित्तीय वर्ष
समाप्त झाल्यापासून चार महिन्यांच्या मुदतीत म्हणजे 31 जुलै पर्यंत संस्थेचे
लेखापरीक्षण पूर्ण करुन घेणे वैधानिक दृष्टया बंधनकारक आहे. तसेच वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून सहा
महिन्याच्या मुदतीत (म्हणजे 30 सप्टेंबर ) वार्षिक सर्वसाधारण सभा घेणेसुध्दा
बंधनकारक आहे. याशिवाय कलम 79 (1अ) मधील तरतुदीनुसार 30 सप्टेंबर पूर्वी कलम 79 (1अ)
च्या (क) ते (च) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वार्षिक अहवाल आर्थिकपत्रके इत्यादी विवरणपत्रे निबंधकास ऑनलाईन सादर करणे
बंधनकारक आहे. कलम 79 (1ब) नुसार वार्षिक
सर्वसाधारण सभेत पुढील वर्षासाठी (वर्ष सन 2018-19 साठी) संस्थेचे लेखापरीक्षण
करुन घेण्यासाठी लेखा परीक्षकांच्या नामतालीकेतून लेखापरीक्षकाची नेमणूक
करण्याबाबत ठराव घेऊन नियुक्ती करणे बंधनकारक आहे.
वैधानिकदृष्ट्या बंधनकारक असलेली
कार्यवाही न करणाऱ्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळास व जबाबदार अधिकाऱ्यास कलम
146 (ग) नुसार अपराध केला म्हणून कलम 147 (ग) मधील तरतुदीनुसार रुपये पाच
हजारापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच संस्थेने
अथवा जिल्हा उपनिबंधक यांनी नेमलेल्या लेखापरीक्षकांनीही 31 जुलै पर्यंत
लेखापरीक्षण पूर्ण करुन लेखापरीक्षण अहवाल संबंधित निबंधक कार्यालय तसेच जिल्हा
विशेष लेखापरीक्षक कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत लेखापरीक्षण
पूर्ण न केल्यास लेखापरीक्षकांची नावे नामतालीकेवरुन कमी करण्याची कार्यवाही होऊ शकते. सर्व सहकारी संस्थांनी वरील प्रमाणे कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था
पा.म.खोडका व जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 उ.गो.तुपे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment