जाणून घ्या…. कुष्ठरोग! पूर्ण उपचार… रोगमुक्ती हमखास
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक
सुचनांनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात 24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत
‘कुष्ठरोग शोध अभियान-2018-19’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने
कुष्ठरोग जाणून घेणे आवश्यक आहे. या आजाराबद्दल खुपच गैरसमज आहेत. त्यामुळे या
आजाराबद्दल उघडपणे बोलणेही टाळले जाते. प्रत्यक्षात नियमित औषधोपचाराने बऱ्या
होणाऱ्या या आजाराबद्दल खुलेपणाने बोलले गेले पाहिजे. जिल्ह्यात येत्या सोमवार (24
सप्टेंबर) पासून कुष्ठरोग शोध अभियान सुरु होत आहे. यानिमित्त विशेष लेख-
इतिहास-
कुष्ठरोग किंवा महारोग म्हणून
ओळखला जाणारा हा आजार मानवाला माहित असलेला पुरातन आजार आहे. आयुर्वेद ग्रंथात आणि
पुराणांमध्ये अनेकदा या आजाराचा उल्लेख आढळतो. एकदा हा आजार झाला म्हणजे त्यामुळे
येणारी विकृती व विद्रुपता यामुळे अशा व्यक्तींना सामाजिक बहिष्कार आणि
तिरस्काराला सामोरे जावे लागले. त्यामुळे या आजाराबद्दल गैरसमज निर्माण झाले.शिवाय
त्याचा संबंध थेट पाप पुण्य या संकल्पनेशी जोडला गेला.
प्रत्यक्षात कुष्ठरोग हा आजार
हा जंतूंमुळे होणारा आजार आहे हे 1873 पर्यंत मानवास माहितीच नव्हते. नॉर्वे मधील
शास्त्रज्ञ डॉ. आरमर हॅन्सन यांनी 1873 मध्ये कुष्ठरोग जंतूंचा शोध लावला.
त्यानंतर हा आजार म्हणजे कुठल्या पाप पुण्याशी संबंधित नसून तो जंतूंमुळे होणारा
संसर्ग आहे हे जगापुढे आले. 1948 पर्यंत या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नव्हते.
त्यामुळे त्याला असाध्य समजण्यात आले. 1948 पासून औषधाचा शोध लागल्यावर त्यात
विविध संशोधनांद्वारे विकास होत गेला. 1980 मध्ये एम.डी.टी. (Multi Drug
Theropy अर्थात बहुविध औषधोपचार उपचार
पद्धती) ह्या अत्यंत सोप्या, प्रभावी व परिणामकारक उपचार पद्धतीचा अवलंब सुरु झाला आणि कुष्ठरोग
हा त्यांच्या संसर्गाच्या प्रमाणानुसार
अवघे सहा महिने ते एक वर्ष इतक्या कालावधीच्या उपचाराने पूर्ण बरा होऊ शकतो. अनेक
रुग्ण या रोगमुक्तीची अनुभूती घेत आपले जीवन समाधानाने जगत आहेत.
कुष्ठरोग होण्याची कारणे-
कुष्ठरोग हा कुष्ठ जंतूंमुळे (मायक्रो
बॅक्टेरिअम लॅप्रे) होणारा सांसर्गिक आजार आहे.
उपचार न घेतलेल्या सांसर्गिक कुष्ठ रोग्याकडूनच कुष्ठरोग जंतूंचा प्रसार
केवळ हवेच्या माध्यमातून होतो. श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत श्वसन मार्गातून हे
जंतू शरिरात प्रवेश करतात. या जंतूंचा अधिशयन काळ म्हणजेच संसर्ग झाल्यापासून ते
लक्षणे दिसेपर्यंतचा काळ 3 ते 5 वर्षापर्यंतचा आहे. विशेष म्हणजे सर्वच कुष्ठरोगी
हे सांसर्गिक म्हणजेच रोगजंतूंचा प्रसार करणारे नसतात. त्यांचे प्रमाण केवळ 10 ते
15 टक्के इतकेच असते. कुष्ठ रोगाची शारिरीक लक्षणे आणि चिन्हे यावरुन उपचारासाठी सांसर्गिक आणि असांसर्गिक असे दोन
गटात विभागणी केली जाते. यातील दोन्ही प्रकारचा कुष्ठरुग्ण हा औषधोपचार सुरु
केल्याच्या दिवसापासून रोगजंतूंचा प्रसार
करु शकत नाही. म्हणजेच उपचार सुरु करताच रोगी हा असांसर्गिक तर होतोच शिवाय पूर्ण
उपचार घेतल्याने रोगमुक्तही होतो.
सर्व सांसर्गिक
रोगांमध्ये कुष्ठरोग हा सर्वात कमी
सांसर्गिक आजार आहे. कुष्ठरोगाच्या तुलनेत
क्षयरोग, सामान्य सर्दि खोकला, गोवर , कांजण्या हे आजार अधिक प्रमाणात सांसर्गिक
आहेत.
कुष्ठरोग कुणाला होऊ शकतो?
कुष्ठरोगाविरुद्ध मानवी
शरीरात नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती असल्यामुळे 98 टक्के लोकांना या आजाराचा संसर्ग
होऊच शकत नाही. कुष्ठरोग होणे किंवा न होणे हे पूर्णतः रोगप्रतिकार शक्तीवरच
अवलंबून असतं. प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असल्याने रोगाविरुद्ध लढण्याची शक्तीही वेगवेगळी
असते. तथापि कुष्ठरोगाबाबत कोणतीही
रोगप्रतिबंधक लस उपलब्ध नाही. त्यामुळे कुष्ठ रोगाच्या लक्षणांची माहिती आणि
औषधोपचार हाच सर्वोत्तम बचाव व सुरक्षित उपाय होय.
कुष्ठजंतू
कुष्ठरोगाच्या जंतूंचा प्रजनन
कालावधी हा 15 ते 20 दिवस इतका दीर्घ असतो. म्हणूनच अधिशयन काळ सुद्धा 3 ते 5 वर्षे इतका दीर्घ असतो. हे जंतू
प्रामुख्याने चेतासंस्था आणि त्वचा यावर आघात करतात. म्हणूनच या रोगाची लक्षणे
त्वचा व चेतातंतूंवर दिसतात.
कुष्ठरोगाची लक्षणे-
1)अंगावरील डाग- अंगावरील त्वचेच्या रंगापेक्षा
फिकट, लालसर रंगाचा कुठलाही डाग, चट्टा.
2) त्वचेच्या रंगरुपात ,
पोतात होणारे बदल- त्वचा तेलकट, लालसर, सुजलेली व गुळगुळीत होते. जाड झालेल्या
कानाच्या पाळ्या, अंगावर येणाऱ्या गाठी असे बदल त्वचेत होतांना दिसतात.
3) चेतातंतू बाधित झाल्याने
होणारे बदल- चेतातंतू बाधित झाल्यावर
संबंधित भागात सुन्नपणा, बधिरता येते, घाम न आल्याने त्वचेला कोरडेपणा येतो, भेगा
पडतात. स्नायूंत अशक्तपणा येऊन त्यांचे
कार्य विस्कळीत होते. अशा अवयवांना वारंवार इजा व जखमा होण्याची शक्यता असते.
यामुळे चेहरा व हातापायांमध्ये विकृती निर्माण होते.
कुष्ठ रोगाची वैशिष्ट्ये-
कुठलाही त्रास होत नाही,
खाजवत नाही, दुखत नाही, एकदम वाढत नाही त्यामुळे लक्षात येत नाही. शरीरावर कुठेही
हे डाग येऊ शकतात. त्यामुळे पाठीवर किंवा कपड्यांनी झाकल्या गेलेल्या जागेवरील
लक्षणे लक्षात येत नाहीत. ती दुर्लक्षिली किंवा लपविली जातात. लक्षणांच्या संख्येत, आकारात वाढ फारच मंदगतीने
होते त्यामुळे तातडीने उपचार करण्याकडे कल नसतो.
महत्त्वाचेः कुष्ठरोगाचे डाग हे थेट पांढऱ्या रंगाचे नसतात. असे
डाग हे त्वचेला मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे व अभावामुळे येतात. त्याला
प्रचलित भाषेत पांढरे डाग किंवा पांढरे कोड असते म्हणतात. हा केवळ एक त्वचा विकार
आहे. तसेच जन्मखूण, चट्टा इ. डागही कुष्ठरोगाचे नसतात.
उपचार- कुष्ठ रोगावर बहुविध औषधोपचार
पद्धती वापरली जाते. ही अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. शिवाय सर्व सरकारी दवाखान्यात
मोफत उपलब्ध आहे. या उपचार पद्धतित रिफाम्पिसीन, लोफाझिमीन व डॅप्सोन यासारख्या
प्रभावी औषधांचा वापर केला जातो. म्हणुन ही औषधे दीर्घकाळ व नियमित आणि पूर्ण
कालावधीसाठी घेणे आवश्यक असते. या उपचार पद्धतीने कुठल्याही प्रकारचा ( पॉसी
बॅसिलरी अथवा मल्टि बॅसिलरी) कुष्ठरोग हा सहा महिने ते एक वर्ष इतक्या कालावधीत
पूर्ण बरा होतो. गरोदर स्त्रियांना, तसेच अन्य आजार असतांना, त्या उपचारासोबत ही
औषधे घेता येतात. उपचारानंतर राहून गेलेल्या विकृती या भौतिकोपचार व स्वयंदेखभालीने काळजी घेऊन बरे
होऊ शकतात. हे उपचार सर्व सरकारी दवाखाने,
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व कुष्ठसेवा कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या
आरोग्य केंद्रांमधून मोफत दिले जातात.
कुष्ठरोग हा केवळ औषधोपचाराने
पूर्ण बरा होणारा सामान्य आजार आहे. त्यामुळे या आजाराबद्दल गैरसमज दुर करुन
कुष्ठरुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलावा. त्यासाठी लोकशिक्षण व्हावे
हेच उत्तम.
कुष्ठरोग शोध अभियान (24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर)
या अभियानात जिल्ह्यातील ग्रामिण
भागात व शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करुन प्रत्येक घरातील सर्व सभासदांची
तपासणी करण्यात येईल. एका पथकात एक पुरुष
व एक महिला असे दोन सदस्य असतील. जे
अनुक्रमे पुरुष व महिलांची तपासणी
करतील. एक पथक दिवसभरात ग्रामीण भागात 20
तर शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करतील.
रायगड जिल्ह्यात 4 लाख 29 हजार 755 घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन घरातील
सदस्यांची तपासणी करण्यासाठी 1857 पथके तयार करण्यात आली आहेत. नागरिकांनी या
कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य सेवकांकडून आपली व आपल्या कुटूंबियांची
तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
डॉ. विजय सूर्यवंशी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी
केले आहे.
-
संकलनः-जिल्हा
माहिती कार्यालय रायगड- अलिबाग
00000
Comments
Post a Comment