पाणी पुरवठा तात्काळ सुरु होण्यासाठी उपाययोजना करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी


माथेरान डोंगरातील आठ वाड्यांच्या पाणी प्रश्नी बोलावली तातडीची बैठक
अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका)-:- माथेरान डोंगरात असलेल्या  आठ वाड्यांना उपाययोजना करुन तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करा, असे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूयवंशी यांनी यंत्रणांना दिले. यासंदर्भात कविता  वसंत निरगुडे या युवतीने जिल्हाधिकाऱ्यांना थेट पत्र लिहून आपली व्यथा मांडल्याबाबत स्थानिक वृत्तपत्रांतून बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्याची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली. तत्पूर्वी  संबंधित प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी  यांना प्रत्यक्ष वाड्यांवर पाठवून तेथी परिस्थितीचा अहवाल मागविला. त्यानंतर त्यांनी बैठक बोलावून या प्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत चर्चा केली.
 या परिसरातील सागाची वाडी, आसल वाडी, बोरीची वाडी, भुतिवली वाडी, चिंचवाडी, धनगरवाडा, धामणदांडा, नाचण्यामाळ या आठ वाड्यांचा पाणी प्रश्न बिकट होत आहे. त्यासंदर्भात या वाड्यांच्या समोर असलेल्या पाली भूतिवली धरणातून कायम स्वरुपी पाणी पुरवठा व्हावा, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत सादर झालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता पी.एस. जोशी यांनी माहिती दिली की, पाली भूतिवली धरणाच्या पायथ्याशी  उद्भव विहिर घेऊन त्यातून पंपिंग करुन  धामणदांड येथे पाण्याच्या टाकीत टाकणे व तेथून या गावांना गुरुत्वाने पाणी पुरवठा करणे अशी 1 कोटी 40 लाख रुपयांची योजना प्रस्तावित आहे. या योजनेच्या कामास गती मिळणे अपेक्षित आहे. या संदर्भात स्वतः जिल्हाधिकारी हे पाठपुरवठा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या योजनेत सुमारे 5 किमी पाईप लाईनचा अंतर्भाव आहे.  प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित व्हायला वेळ लागणार असल्याने आता तातडीने पाणी पुवरठा करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी  आनंद पाटील यांनी माहिती दिली की, या परिसरात पाली भूतिवली धरणाजवळ आसल गावाजवळ एका उद्भव विहिरीतून स्थानिक गावकऱ्यांनी लोक सहभागातून पाईप लाईन टाकली आहे. तथापि ही पाईप लाईन गळकी असल्याने त्यातून पाणी उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, या ठिकाणी उद्योजकांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तातडीने लोखंडी पाईप व विद्युत पंप उपलब्ध करुन देण्यात यावा व हि योजना कार्यान्वित करण्यात यावी, यामुळे आसल, भुतिवली, बोरीचा माळ, सागाची वाडी, धामणदांड या गावांचा पाणी प्रश्न सोडविता येईल. उर्वरित गावात  लहान मशिन नेऊन बोअर घेण्यात यावे, किंवा अस्तित्वात असलेल्या विहिरींमध्ये आडवे बोअर घेऊन पाण्याची उपलब्धत तपासण्यात यावी व पाण्याचा प्रश्न सोडवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे स्वतः पत्र लिहिणाऱ्या कविता निरगुडे हिचेशी दूरध्वनीवरुन बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक