महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान:नाडसूर ग्रा.पं.च्या वैतागवाडीत तयार टेराकोटा दागिने मुंबईच्या प्रदर्शनात
अलिबाग,जि. रायगड, दि.20(डॉ.मिलिंद
दुसाने)- बाजारात टेराकोटाच्या दागिन्यांना (विशिष्ट
प्रकारच्या मातीपासून बनविलेले) मोठी मागणी आहे. ही मागणी ओळखुन सुधागड तालुक्यातील
नाडसुर ग्रामपंचायतीतील वैतागवाडीच्या महिलांनी एकत्र आल्या; टेराकोटा दागिन्यांची
निर्मिती करुन बाजारपेठेत जाण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. मुंबई येथील
मुंबई स्टॉक एक्सचेंज तर्फे आयोजित वित्त व साहित्य या विषयावरील दलाल स्ट्रीट
फेस्टिव्हल मध्ये त्यांनी बनवलेल्या दागिन्यांचे प्रदर्शनही लागले होते. आता या महिला
मोठ्या शहरातील बाजारात बनविलेले दागिने विकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
पारंपारिक
कौशल्याला आधुनिकतेची जोड
रायगड जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतीतील 55 गावांमध्ये मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान
राबविण्यात
येत आहे. नाडसूर ता. सुधागड ही ग्रामपंचायत त्यापैकीच एक. या ग्रामपंचायतीत येणाऱ्या वैतागवाडी गावातील शेतकरी
महिला उत्पादक बचत गट आणि धोंडसे गावातील संत गोरोबा कुंभार महिला बचत गट अशा दोन
बचत गटाच्या महिला.
यापैकी संत गोरोबा कुंभार महिला बचत गटाच्या महिला या पारंपारिक
कुंभार व्यवसाय करणाऱ्या असल्याने त्या मातीच्या चुली, पणत्या, मडके आदी बनवत होत्या. त्यांना
मातीची
प्रक्रिया, वस्तू बनवणे त्यानंतर त्या भट्टीत भाजणे आदी प्रक्रियेचे ज्ञान होतेच. येथील ग्राम समाज परिवर्तक करिश्मा वेंकटेश्वरन
हिने या महिलांना एकत्र करुन त्यांच्याकडे
असलेल्या पारंपारिक अंगिभूत कौशल्याचा उपयोग करण्याचे ठरविले. त्यातून टेराकोटा ज्वेलरी बनविण्याच्या व्यवसायाची
संकल्पना पुढे आलीय. इकोस्पिरीट या संस्थेने या महिला बचतगटांना दागिने बनविण्याचे
प्रशिक्षण, कच्चा माल पुरवठा व तयार मालापैकी 80 टक्के मालाची खरेदी करण्याबाबत
तयारी दर्शविली. त्यानुसार या महिलांना टेराकोटा दागिने बनविण्याचे प्रशिक्षण
देण्यात आले. आता या महिला अत्यंत सुबक, सुंदर दागिने बनवू लागल्या आहेत.
टेराकोटा
म्हणजे काय?
टेराकोटा एक विशिष्ट प्रकारची माती असते. ही माती खुप प्रक्रिया करुन
तिचा गोळा केला जातो. त्यावर खूप सुक्ष्म काम केले जाऊ शकते. रबाळे ता. पनवेल येथे
या मातीवर प्रक्रिया करुन तिची विक्री केली जाते. 65 रुपये प्रतिकिलो दराने ही
माती कच्चा माल म्हणून उपलब्ध होते.
दागिने असे
बनतात
टेराकोटा मातीचा ओला गोळा बनवून (क्ले) त्याला वेगवेगळे आकार दिले जातात. यासाठी काही
लहान लहान वस्तू अवजारे म्हणून वापरता येऊ शकतात. ते या महिला सरावाने करु लागल्या
आहेत. काही साचेही असतात. त्यातून आकारही दिले जातात. मणी, कडे, पेंडंट, कानातले झुमर, टॉप्स इ. बारीक बारीक
वस्तूही तयार करता येतात. या वस्तू उन्हात एक दिवस वाळवाव्या लागतात. त्यानंतर घरात
चुलीवर किंवा गॅस शेगडीवरही भाजता येऊ शकतात. या वस्तूंना भाजण्यासाठी एका मोठ्या
भांड्यात वाळू अथवा बारीक मिठ घेऊन ते तापवून त्यात या वस्तू भाजावयाच्या असतात. हे
काम महिला आपल्या स्वयंपाक घरातही करु शकतात.भाजणी झाल्यानंतर या वस्तू बाहेर काढुन त्यांना रंगकाम करायचे असते. आणि त्यानंतर या
वस्तू बाजारात विक्रीसाठी सज्ज होतात.
टेराकोटाची
मागणी
टेराकोटाच्या दागिने व
वस्तूंना उच्चभ्रू वर्गात मोठी मागणी आहे. फॅन्सी दागिने म्हणून , ॲक्सेसरीज
म्हणून त्यांचा वापर होत असतो. शिवाय वस्तूंचा शोपिस म्हणून घरात वापण्याचा ट्रेण्ड
आला आहे. मोठ्या मॉल्स मध्ये या वस्तूंची दालने दिसून येतात.
व्यवसायाचे
गणित
एक किलो माती 65 रुपयांना आणल्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन व तीन दिवसांचा रोजगार व त्याचे आकर्षक
पॅकिंगचा खर्च गृहित धरुन एका महिलेला 1500
रुपये खर्च येतो. आणि या तीन दिवसात तिने
बनविलेल्या दागिन्यांचे बाजारमूल्य 5000 रुपयांपर्यंत होते. एकंदर घरी फावल्या
वेळेत महिला हा व्यवसाय करु शकतात. नाडसूर ग्रा.पं.च्या महिलांनी हा व्यवसाय सुरु
केलाय. त्यांच्या बाजारपेठ संलग्नतेसाठी ग्राम सामाजिक परिवर्तकांमार्फत प्रयत्न होत
आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज मुंबईतही या दागिन्यांचे प्रदर्शन झाले.
त्याचा या महिलांच्या व्यवसाय वृद्धीसाठी नक्कीच फायदा होईल.
Comments
Post a Comment