ग्रंथांनीच घडविला आमच्यातला साहित्यिक परिसंवादातून साहित्यिकांनी व्यक्त केले ग्रंथांचे ऋण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ‘माझ्या जडणघडणीतील ग्रंथांचे महत्व’ या विषयावर आयोजित परिसंवादात मान्यवर साहित्यिकांनी ‘आपली साहित्यिक म्हणून झालेली जडण घडण ग्रंथांमुळेच झाली’, अशा शब्दात ग्रंथांप्रति आपले ऋण व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने आयोजित रायगड जिल्हा ग्रंथोत्सव – 2018चेआयोजन सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल येथे करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात ‘ माझ्या जडणघडणीतील ग्रंथांचे महत्त्व’ या विषयावर आपली मते मांडली. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अलिबाग येथील ज्येष्ठ साहित्यिक विलास नाईक हे होते. या परिसंवादात उरण येथील एल.बी. पाटील, पनवेल येथील प्रा. चंद्रकांत मढवी, गोरेगाव येथील डॉ. नंदकुमार मराठे, अलिबाग येथील पूजा वैशंपायन या साहित्यिकांनी सहभाग घेतला.
यावेळी उरण येथील एल. बी. पाटील म्हणाले की, मी खेडेगावातला, पाठ्यपुस्तकां व्यतिरिक्त फारसे वाचन नाही पण निसर्ग आणि माणसांचे वाचन केले. नंतर महाविद्यालयीन जीवनात वाचन करत लिहिण्याची प्रेरणा आली. ही प्रेरणा येण्यामागे नाटकं पाहण्याची आवडही कामी आली.
पनवेल येथील प्रा. चंद्रकांत मढवी, यांनी सांगितले की, निसर्ग आणि माणसं वाचण्याचा छंद आधीपासूनच होता. त्यात वाचनाची भर पडल्यानंतर ग्रंथ वाचता वाचता लेखनाची प्रेरणा मिळाली.  त्यातून झालेल्या लेखनाला रसिकांनी  पसंती दिल्याने उत्साह वाढला.आपले विचार मांडतांना डॉ. नंदकुमार मराठे, म्हणाले की, संशोधन करतांना अनेक ग्रंथ, प्राचीन ग्रंथांचे वाचन झाले. त्यातून पुढे लिखाण घडले. श्रीमती पुजा वैशंपायन, म्हणाल्या की, कविता ही माझी पहिली आवड, शाळेतल्या कवितांची गोडी लागली. त्यातील काही कवितांमधून आपली दुःखे व भावविश्व साकार होत असल्याचे वाटल्याने पुढे कविता लेखनाकडे वळली. खरा लेखनप्रवास मात्र लग्नानंतरच सुरु झाला.
 परिसंवादाचे अध्यक्ष ॲड. विलास नाईक म्हणाले की, वकिलीचा व्यवसाय करतांना खूप माणसे भेटत गेली. ही माणसं वाचता वाचता लेखन करु लागलो. त्यांची सुख दुःख या लेखनातून मांडता आली.  हे लिखाण करतांना अन्य लेखकांच्या साहित्यकृती वाचनाचा खूप लाभ झाला असे त्यांनी सांगितले. व.पु.काळे, पु. ल. देशपांडे यांचे लिखाण आपणास आवडते असे त्यांनी सांगितले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन रमेश धनावडे यांनी केले. या परिसंवादाला रसिकवाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज