संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कोकण विभागीय पुरस्काराचे वितरण प्रथम पुरस्कार कुशेवाडा जि.सिंधुदूर्ग, द्वितीय पुरस्कार चांदोरे जि.रायगड आणि तृतीय पुरस्काराचे मानकरी पावणाई जि.सिंधुदूर्ग


नवी मुंबई,दि.04 :- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2017-18 अंतर्गत विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा प्रथम पारितोषिक रु.10 लाख ग्रामपंचायत कुशेवाडा ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग, द्वितीय पारितोषिक रु.8 लाख ग्रामपंचायत चांदोरे ता.माणगांव जि.रायगड, तृतीय पारितोषिक रु.6 लाख ग्रामपचांयत पावणाई ता.देवगड जि.सिंधुदुर्ग, स्व.आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार (कुटूंब कल्याण) विशेष पुरस्कार रु.30 हजार ग्रामपंचायत नाखरे ता.रत्नागिरी जि.रत्नागिरी, स्व.वसंतराव नाईक पुरस्कार (पाणी व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन) विशेष पुरस्कार रु.30 हजार ग्रामपंचायत रोठ बुद्रुक ता.रोहा जि.रायगड, स्व.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (सामाजिक एकता) विशेष पुरस्कार रु.30 हजार ग्रामपंचायत मांडे ता.पालघर जि.पालघर या ग्रामपंचायतींचा  स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन विभागीय कोकण महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, लोकांचे आरोग्य, जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन वेळोवेळी लोकसहभागातून विविध शासकीय उपक्रम राबविते. त्याचाच एक भाग म्हणजे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येतात. हा कार्यक्रम ग्रामीण जनतेस आपला वाटावा व त्याचे महत्व पटून त्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्न करते.
आज संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2017-18 अंतर्गत कोकण विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम कोकणभवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभय यावलकर, पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मिलींद बोरीकर, रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, उपायुक्त (विकास) भारत शेंडगे, उपायुक्त (आस्थापना) गणेश चौधरी,  सहायक आयुक्त दिपाली देशपांडे आदि उपस्थित होते.
महसूल आयुक्त डॉ.पाटील पुढे म्हणाले की, ग्रामविकास हा महत्वाचा टप्पा आहे. ग्रामविकास करणे ही फक्त ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. गावात लोकसहभागातून विकास कामे केली तर ती इतर ग्रामपंचायतींनाही दिशादर्शक होतील. आपण नैसर्गिक स्त्रोताचा जबाबदारीने वापर केला पाहिजे, त्याचा विनाश न करता ते पुढच्या पिढीला हस्तांतरित केले पाहिजेत. जमिन, पाणी किटकनाशकांच्या वापरामुळे दुषित होत आहे. त्यामुळे कॅन्सर सारखे आजार होत आहेत. फॅमिली डॉक्टरसारखे फॅमिली शेतकरी निवडण्याची वेळ आली आहे. आपण गावात घनकचरा व्यवस्थापन, गाव परिसर स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, कचरा विघटन व त्यापासून बायप्रोडक्ट ज्याचा शेतीसाठी उपयोग होईल असे उपक्रम राबविले पाहिजेत. गावातील गरजेचे प्राधान्यक्रम ठरवून लोकांना शिक्षणाचे, स्वच्छतेचे महत्व पटवून दिले पाहिजे. यातूनच आपले समाज स्वास्थ्य टिकवून राहील असेही ते म्हणाले.  यावेळी डॉ.पाटील यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले.
श्री.बोरीकर म्हणाले की, पुढच्या दशकात घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन या समस्या होत जाणार आहेत. त्यासाठी ग्रामस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजही अनेक ग्रामपंचायती शासकीय कार्यक्रमात सहभाग नोंदवत नाहीत. प्रशासनाला त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. ग्रामीण जनतेने यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला पाहिजे हे अभियान लोकचळवळ झाली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त (विकास) भारत शेंडगे यांनी केले. त्यांनी या अभियानाचा शासनाचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, ग्रामविकासाशी निगडीत एखाद्या क्षेत्रात भरीव काम करणा-या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तारावर या अभियानांतर्गत  विशेष बक्षिसे दिले जातात. ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मुळ उद्देश ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे हा आहे.
कार्यक्रमाचे आभार उपायुक्त (आस्थापना) गणेश चौधरी यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमात कुशेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश सामंत व मांडे ग्रामपंचायतीचे सरपंच जयेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज