इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ : वास्तूनिर्मिकांच्या कल्याणासाठी जिल्ह्यास 5कोटी 24 लक्ष रुपये निधी आतापर्यंत 5271 लाभार्थ्यांना 2 कोटी 63 लाख रुपयांचे वितरण



अलिबाग,जि.रायगड,दि.7(जिमाका)- आपल्या श्रमांनी वास्तूनिर्मिती करुन निवारा उभारुन देणाऱ्या कसबी कामगारांना आयुष्यात उत्तम आरोग्य, त्यांच्या पुढच्या पिढीला शिक्षण आदी सुविधा व सुरक्षितता देण्यासाठी शासनाने इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती केली आहे. रायगड जिल्ह्यात या मंडळाच्या योजना कामगार उप आयुक्त कार्यालय, रायगडमार्फत राबविण्यात येतात. जिल्ह्यातील वास्तू निर्मिकांच्या कल्याणासाठी जिल्ह्याला 5 कोटी 24 लक्ष 84 हजार रुपये निधी प्राप्त झाले असून आतापर्यंत 5271 लाभार्थी कामगारांना  2 कोटी 63 लाख 36 हजार 400 रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीतून कामगारांचे शिक्षण, आरोग्य या सारख्या सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे.
यासंदर्भात कामगार उप आयुक्त कार्यालय, नवीन पनवेल  यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन आणि सेवाशर्ती) अधिनियम 1996 अंतर्गत नोव्हेंबर 2018 अखेरीस 455 आस्थापना नोंदीत करण्यात आल्या आहेत.  तसेच इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळामध्ये नोव्हेंबर 2018 अखेरीस 21663 कामगारांची लाभार्थी कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे. 
आतापर्यंत (नोव्हेंबर 2018 अखेर)मंडळाने घोषित केल्याप्रमाणे 182 नोंदीत लाभार्थी कामगारांना प्रति लाभार्थी तीन हजार रुपयांप्रमाणे 5लक्ष 46 हजार रुपये अर्थसहाय्य  वाटप करण्यात आले असून 5020 लाभार्थी कामगारांना प्रत्येकी  पाच हजार रुपयांप्रमाणे रु.2 कोटी 51 लक्ष रुपये अवजारे खरेदी करण्याकरीता अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे.  तसेच 67 लाभार्थी कामगारांना शैक्षणिक लाभ 6लाख 60हजार 400रुपये तर दोघा लाभार्थी कामगारास तीस हजार रुपये प्रसुती लाभाची रक्कम वाटप करण्यात आली आहे.  या कार्यालयाकडे कामगारांच्या कल्याणासाठी एकूण 5 कोटी 24 लक्ष 80हजार रुपये निधी प्राप्त झाला असून आजमितीपर्यंत एकूण 2 कोटी 63 लाख 36 हजार 400 रुपये इतक्या रकमेचे वाटप 5271 लाभार्थी कामगारांना करण्यात आलेले आहे. 
ज्या कामगारांची नोंदणी जिवित आहे अशा कामगारांच्या पाल्यांसाठी मंडळातर्फे नवनीत ॲडव्हान्स्ड डिक्शनरी, नवनीत जनरल नॉलेज, नवनीत स्पीकवेल इंग्लिश, इसापनीती 1,2,3 व पंचतंत्र 1,2,3 इत्यादी एकूण 9 पुस्तकांच्या संचाचे वाटप करण्यात आलेले आहे.
(जिवीत नोंदणी म्हणजे ज्या कामगारांनी आपल्या नोंदणीचे नुतनीकरण केले आहे, अशा नोंदणीस जिवित नोंदणी संबोधले जाते.)
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजना
योजना क्र.1: नोंदीत लाभार्थी स्त्री बांधकाम कामगारास तसेच नोंदीत पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पत्नीस नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी वीस हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य.
योजना क्र.2: नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगारांच्या प्रति शैक्षणिक वर्षी शाळेतील किमान 75 टक्के किंवा अधिक उपस्थिती असणाऱ्या दोन पाल्यांस इयत्ता 1 ली ते 7 वी साठी प्रतिवर्षी अडीच हजार रुपये किंवा इयत्ता 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य.
योजना क्र.3: नोंदीत लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना इयत्ता 10 वी ते इयत्ता 12 वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये एवढे प्रेात्साहानात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य.
योजना क्र.4- नोंदीत लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना इयत्ता 11 वी ते इयत्ता 12 वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी दहा हजार रुपये एवढे शैक्षणिक सहाय्य.
योजना क्र.5: नोंदीत लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपये एवढे शैक्षणिक सहाय्य.
योजना क्र.6: नोंदीत लाभार्थी कामगाराच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इ.साठी प्रति शैक्षणिक वर्षी  वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता एक लक्ष रुपये  व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता साठ हजार रुपये एवढे शैक्षणिक सहाय्य.
योजना क्र.7: नोंदीत लाभार्थी कामगाराच्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रति शैक्षणिक वर्षी वीस हजार रुपये  आणि पदव्युत्तर पदविकामध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रति शैक्षणिक वर्षी पंचवीस हजार  रुपये एवढे आर्थिक सहाय्य.
योजना क्र.8: नोंदीत लाभार्थी कामगार अथवा त्याच्या पती-पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर   कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी एक लाख रुपये मुदत बंद ठेव.
योजना क्र.9: नोंदीत लाभार्थी कामगारास 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास दोन लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य.  तथापि नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास विमा  रकमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ अनुज्ञेय राहील.
योजना क्र.10: नोंदीत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास दहा हजार रुपये एवढी रक्कम अंत्यविधीसाठी मदत.
योजना क्र.11: नोंदीत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस प्रतिवर्षी चोवीस हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य. (फक्त पाच वर्षासाठी)
योजना क्र.12: नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराचा  कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास पाच लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य.
योजना क्र.13: लाभार्थी कामगार व त्याच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपये एवढे वैद्यकीय सहाय्य. (एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटूंबातील दोन सदस्यांपर्यंत मर्यादित) तथापि आरोग्य विमा योजना लागू नसल्यासच सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.
योजना क्र.14: संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेत असलेल्या नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना शुल्काची परीपूर्ती.  तथापि MS-CIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात यावी.
योजना क्र.15: नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगारांच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये अनुदान. 
योजना क्र.16: दिनांक 31 ऑगस्ट 2014 रोजी नोंदणी जिवित असलेल्या सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी प्रति कामगार तीन हजार रुपये एवढे अर्थसहाय्य. 
योजना क्र.17: नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप. 
योजना क्र.18: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामागारांकरीता व्यसनमुक्ती केंद्रातर्गत उपचाराकरीता नोंदीत बांधकाम कामगारास सहा हजार रुपये इतके अर्थसहाय्य. 
योजना क्र.19: अवजारे खरेदीकरण्याकरीता प्रथमत: पाच हजार रुपये  इतके अर्थसहाय्य मिळण्याबाबत.
नोंदणी कशी कराल?
 या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित कामगारांनी 90 दिवस काम केल्याचे मालकांचे प्रमाणपत्र, आपले बॅंक खात्याचे विवरण व आधारक्रमांक नोंदवायचा असतो. त्यानंतर कामगाराची नोंदणी होते.  ही नोंदणी दोन वर्षांसाठी असते. त्याचे नूतनीकरण करता येते त्यासाठी 25 रुपये शुल्क आकारले जाते. शिवाय दरमहा 1 रुपया या प्रमाणे 60 रुपये अंशदान घेतले जाते. सध्या रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर 2018 अखेर 21 हजार 663 कामगारांची लाभार्थी नोंदणी झालेली आहे.
बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याची जबाबदारी ही त्या त्या बांधकाम मालकाची म्हणजेच कंत्राटदाराची असते. तसेच जे कामगार दररोज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी रोजंदारी स्वरुपात कामावर जातात (मजूर अड्ड्यावरील कामगार) अशा कामगारांची नोंदणी जिल्ह्यातील कार्यरत गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे होते. त्याबाबत त्यांना नोंदणी झाल्याचा दाखलाही दिला जातो. तसेच  जिथे जिथे बांधकाम नाके असतात अशा ठिकाणीही एकत्रित नोंदणी होऊ शकते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे कामगार उपायुक्त भगवानआंधळे यांनी केले आहे. 
अधिक माहितीसाठी संपर्कः- कामगार उपायुक्त कार्यालय, विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स,  पहिला माळा, जुना मुंबई पुणे महामार्ग, सेक्टर 1, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, जि. रायगड.  दूरध्वनी-022-27452835.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक