प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना:अधिकाधिक श्रमिकांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.1:- केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून असंघटित
क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना
सुरु केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून
त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नाव नोंदणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील असंघटीत
क्षेत्रातील जास्तीत जास्त श्रमिकांनी या
योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रकार
परिषदेत केले.
या योजेनेच्या जनजागृतीसाठी आज जिल्हाधिकारी
कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदी उपस्थित
होते.
यावेळी माहिती
देण्यात आली की,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हे नोडल अधिकारी
आहेत. तर या योजनेत कामगारांना सहभागी करुन घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दि.4
मार्च रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
लाभदायक योजना
ज्या कामगारांना
पेन्शन योजना लागू नसते अथवा खाजगी पेन्शन योजनेमध्ये देखील जे सहभागी होऊ शकत
नाहीत अशा स्वरुपाच्या कामगारांना वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन प्राप्त
होण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत लाभदायक आहे.
असंघटीत व शासकीय यंत्रणांसोबत काम करणारे
प्रवर्गांचाही सहभाग
या योजनेचा लाभ घरात
काम करणारे कामगार,दुकानातील कामगार, ड्रायव्हर, प्लंबर, मिड डे मील वर्कर, रिक्षा
चालवणारे, वीटभटटीवर काम करणारे कामगार, कारखान्यातील कामगार, शेत मजुर इ. असंघटित
शेतातील कामगारांसोबत शासकीय यंत्रणांच्या सोबत काम करणारे काही प्रवर्ग यात
अंगणवाडी सेविकांचे मदतनीस, ग्रामपंचायत कडील कंत्राटी कामगार महिला, बचत गटाच्या
सदस्य असलेल्या महिला इ. देखील लाभ घेऊ शकतात.
निकष
त्यासाठी त्यांचे
महिन्याचे उत्पन्न पंधरा हजार रुपये पेक्षा कमी असावे तसेच त्यांचे वयोगट 18 ते
40 यामध्ये असावा. वयोपरत्वे
लाभार्थ्यांना वेगळा हप्ता असुन लाभार्थी जितका हप्ता भरणार आहेत तेवढाच हप्ता
केंद्र सरकारही देणार आहे.
उदाहरणार्थ
एखाद्या लाभार्थ्यांचे वय 18 आहे तर त्याला हप्ता येईल 55 रुपये म्हणजेच केंद्र
सरकारही 55 रुपये म्हणजेच लाभार्थ्यांच्या हात खाते 110 रुपये जमा होतील. वयाच्या
60 वर्षानंतर त्याला रुपये 3000/- एवढी पेन्शन चालु होईल. लाभार्थ्याचा मृत्यु
झाला तरीही त्याच्या कुटुंबीयांना 50%फॅमिली पेन्शन चालु राहिल.
नाव नोंदणीची कार्यपद्धती
या
योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी संबंधित व्यक्ती कोणत्याही LIC ऑफिसमध्ये, विमा
कर्मचारी राज्य विमा आयोगाच्या ऑफिसमध्ये तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
संघटना कार्यालय मध्ये जाऊन अर्ज करु शकते. ग्रामपंचायतस्तरावर नागरिकांची होणारी
गैरसोय टाळण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातुन ही सेवा उपलब्ध करुन
देण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी संबंधित व्यक्तींनी आधार कार्ड व बँक
पासबुकाची झेरॉक्स सोबत न्यावी.
असंघटीतक्षेत्रात
काम करणारे श्रमिक, कष्टकरी, कारागिरांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले.
00000
Comments
Post a Comment