निवडणूक काळात दारू, पैसे वाटपावर करडी नजर ठेवणार आगामी सण -उत्सवाचा उपयोग राजकीय कारणांसाठी करू दिला जाणार नाही -- जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी




रायगड दि १४: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिल्याप्रमाणे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु  झाली असून जिल्ह्यात प्रवेशाच्या सर्व ठिकाणी चेक पोस्ट्सवर विशेषतः दारूची वाहतूक, मोठ्या प्रमाणावर पैसे नेण्यात येत आहेत का यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क  व पोलीस यंत्रणेला देखील अवैध दारूचे अड्डे पूर्णपणे उध्वस्त करण्यास सांगण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रकारांना दिली.
          आज त्यांनी राजस्व सभागृहात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची बैठक घेऊन पोलीस व इतर यंत्रणांना निर्देश दिले. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक अनिल  पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपस्थित होत्या.
आगामी महत्वाच्या धार्मिक व सामाजिक सणांचा वापर करून कोणीही राजकीय स्वरूपाची भाषणे करू नये असे आवाहनही त्यांनी केले असून यासंदर्भातही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे. विशेषतः: शिमगोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी, चवदार तळे येथील कार्यक्रम यामध्ये राजकीय नेते सहभागी होऊ शकतात मात्र त्यांना त्या उत्सवांच्या अनुषंगानेच भाषणे करावी लागतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दारू ,पैसे वाहतूक रोखणार
          निवडणूक काळात दारू आणि पैसे मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने दिले जातात हे प्रकार रोखण्यात येतील असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी म्हणाले कि, प्रसंगी चेकपोस्टवर वाहने तपासण्यात येतील. एवढेच नव्हे तर निश्चित वेळेनंतर सुरु असणारी दारूची दुकाने, मागच्या दराने होणारी दारू विक्री, याच काळात अचानक वाढलेले मद्याचे उत्पादन, बार मध्ये दारू विक्रीत अचानक झालेली वाढ या गोष्टी देखील काटेकोर तपासून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
भरारी पथकेही अलर्ट
          निवडणुकीसाठी २८ समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यांना व  विविध पथक प्रमुख अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत . स्थिर पथके, भरारी पथके, व्हिडीओ पथके आणि एक निवडणूक खर्चाविषयक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार याद्या मतदानापूर्वी दहा दिवस अगोदर अद्ययावत होणार आहे.तालुक्यात कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील नाही तरी देखील पोलीस यंत्रणा सावध आहे. सभा, रॅली, पदयात्रा, लाऊड स्पीकर आदि परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा सुरू केली जाणार असून, निवडणूक आयोगाने तयार केलेल्या सुविधा नावाच्या अ‍ॅपवरून ऑनलाइन पद्धतीने परवानग्या दिल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या  सि व्हिजील अ‍ॅपद्वारे मतदार अथवा नागरिकांनी निवडणूक आचारसंहिता काळातील येणाऱ्या तक्रारींचे निराकरण तातडीने करण्यात येणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. निवडणूक विषयक सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे असेही ते म्हणाले.
मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी सुविधा
          जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून ४ हजार दिव्यांग व्यक्तींना त्या व्यवस्थित चालू शकत नाही म्हणून सुविधाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मतदान केंद्रे अंधारलेली नसावीत याची काळजीही घेण्यात येत आहे असेही ते म्हणाले.
परवानग्या सुलभ रीतीने मिळणार
          सर्व राजकीय पक्षांना आवश्यक त्या सर्व परवानग्या सुलभ रीतीने व नियमाप्रमाणे मिळतील. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी  तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
आचारसंहिता सुरु होताच सर्व ठिकाणचे झेंडे, बॅनर्स काढण्याची कार्यवाही झालीआहे. एसटी बसेस व इतर ठिकाणच्या जाहिराती तातडीने काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोशल मिडिया वरील सर्व मजकुरांवर एका एजन्सीमार्फत २४ तास लक्ष ठेवण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.
किनारी गस्त वाढविली
          समुद्र किनारी पोलिसांच्या १३ गस्ती चौक्या असून पुलवामा हल्ल्यानंतर त्यांना सावधगिरीचा इशारा दिलाच आहे त्यामुळे त्या सक्रिय आहेतच शिवाय काही गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या ४१ जणांना पकडण्यात आले आहे. फरारी गुन्हेगारांची देखील यादी तयार असून त्यावरही कारवाई होत आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक पारस्कर यांनी पत्रकारांना दिली. पोलीस कर्मचाऱ्यांना देखील अतिशय उदबोधक  रीतीने मोबाईलच्या माध्यमातून या निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले.   

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत