01 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त.... जागतिक एकता, सामायिक जबाबदारी !"
विशेष
लेख क्र.38
दिनांक :- 01 डिसेंबर 2020
लाल फित (रेड रिबन) आंतरराष्ट्रीय जनजागृतीचे
एड्सचे प्रतिक मानले गेले. जे एच.आय.व्ही/एड्स या आजाराने मृत्यूमुखी झाले आहेत. त्यांना
श्रध्दांजली वाहण्यासाठी, ज्याची या आजाराने हानी झाली आहे. त्यांना आधार दाखविण्यासाठी
आणि त्यांना झळ पोहोचलेली आहे, त्यांच्याशी दृढ सामाजिक बांधिलकी म्हणून "लाल
फित" लावली जाते."
01 डिसेंबर हा दिवस एड्स सारख्या महाभयंकर
रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी
पाळला जातो. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्ल्यू. बँन आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड
हेल्थ ऑर्गनायझेशनच्या, जिनेवा(स्वित्झर्लंड) येथील जागतिक कार्यक्रमात एड्स या रोगाची
संकल्पना मांडली. डॉ.जानथन मान यांच्या सहमती नंतर 01 डिसेंबर 1988 पासून हा दिवस पाळण्यात
येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्ल्यू बँन व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लंड
मध्ये सन १९८८ मध्ये साजरा केला.या वर्षाचे शासनाचे घोष वाक्य आहे "जागतिक एकता,
सामायिक जबाबदारी !"(Global solidarity, shared responsibility)!
स्वतःचे एचआयव्ही स्टेटस जाणून घ्या (Know
your status)
एड्ससारख्या भयंकर आजाराने जगाला विळखा घातला
आहे. योग्य उपचारांमुळे त्याचे प्रमाण कमी होत आहे. परंतु त्या आजाराबाबत समाजात असलेले
गैरसमज, न्यूनगंड, भेदभाव मात्र कमी झालेला दिसत नाही. एड्स जाणून घेताना स्वतःची देखील
तपासणी करण्याची गरज आहे. आजच्या जागतिक एड्स दिनानिमित्ताने यावर गांभीर्याने विचार
करायला हवा.
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये १९८१च्या
सुमारास अचानक एका विकाराने लोकांना झपाटल्यागत अवस्था झाली. समलिंगी पुरुषांच्या गूढ
आजारामुळे होत असलेल्या मृत्यूच्या घटनांनी ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी अमेरिकेत दहशत
निर्माण केली होती. या लोकांची रोगप्रतिकारशक्ती लोप पावलेली होती आणि त्यामुळे इतरही
रोग त्यांना झालेले आढळले. या विकाराने ग्रस्त झालेल्या मंडळींचा मृत्यूही वेगात होतो
आहे, हे लक्षात आले. मात्र इतरत्र कुठेही होते तसेच अमेरिकेतही झाले. त्याच सुमारास डॉ.लुक माँण्टिग्रेअर (फ्रान्स) आणि
डॉ.रॉबर्ट गॅलो (अमेरिका) या दोन शास्त्रज्ञांनी 1983-84 मध्ये मानवी शरीर पोखरून काढणाऱ्या
ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरसचा स्वतंत्रपणे शोध लावला. समलिंगींचा आजार अशी
ओळख बनलेल्या या व्हायरसने कुणाला कळायच्या आतच अमेरिका आणि आफ्रिका खंडात थैमान घालायला
सुरुवात केली. अमेरिकेत त्याचे ‘गे प्लेग’ असे वर्णन केले गेले.
1986 नंतर भारतात शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचा
रोग म्हणून "एड्सची" लोकांना ओळख झाली. जेव्हा एड्स या आजाराची ओळख झाली
तेव्हा जगात कितीतरी लोकांना एचआयव्ही/ एड्स ची लागण झाली होती आणि कितीतरी लोक आजाराला
बळी पडले होते.
जेव्हा चेन्नई (मद्रास) मध्ये 1986 साली वेश्यावस्तीत
भारतातल्या पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान झालं. पाठोपाठ अनेक मोठय़ा शहरातून, जिथे
जिथे एड्सच्या तपासण्यांची सुविधा होती अशा ठिकाणी रुग्ण सापडू लागले आणि एड्स नावाचा भस्मासूर देशात
उत्पन्न झाल्याची बातमी सर्वदूर पसरली. एकीकडे असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त
संक्रमण,
मातेकडून गर्भाला
किंवा स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमण, शिरेतून नशा आणणाऱ्या औषधांचा वापर , सतत ताप,
वजनात घट, जुलाब इ.या सर्व गोष्टींतून एचआयव्ही विषाणूंचा प्रसार आणि एड्सची लागण वाढतच
चाललेली होती. कोणत्याही व्यक्तीची रोगप्रतिबंधक शक्ती त्याच्या सीडीफोर (CD-४) लिम्फोसाइट
या रक्तपेशीच्या संख्येवरून मोजली जाते. एचआयव्हीचा विषाणू या
‘सीडीफोर लिम्फोसाइट’ वरच हल्ला करीत असल्याने रुग्ण
आपली प्रतिकारशक्ती गमावून बसतो आणि कोणत्याही इतर जंतूसंसर्गाला चटकन बळी पडतो. या
विषाणूंची शरीरात झपाटय़ाने वाढ होऊन शरीरातील प्रतिकार करणाऱ्या पेशींचे प्रमाण- म्हणजे
सीडी 4 काऊंटचे प्रमाण 200 च्या खाली गेले असता या रुग्णांमध्ये निरनिराळे रोग उद्भवतात.
कारण त्यांची सर्वसाधारण जंतू आणि विषाणूंचीही प्रतिकार करण्याची शक्ती मंदावलेली असते.
अशात क्षयरोग, नागीण, बुरशी अशा प्रकारचे विषाणू हल्ला करतात. रुग्णाचा मृत्यू या
‘संधीसाधू’ जंतूंच्या संसर्गामुळेही होत असतो. अशा संसर्गात सर्वात अग्रणी आहेत ते
क्षयरोगाचे जंतू.
ह्युमन इम्युनो डिफीसियन्सी आँफ व्हायरस म्हणजे
एचआयव्ही.माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा विषाणू.
एड्स म्हणजे "अक्वायर्ड (प्राप्त) इम्युनो (प्रतिकार) डिफिशियेंसी
(अभाव) आँफ सिंड्रोम"(लक्षण समूह)
एचआयव्ही चे विषाणू रक्तातील रोगप्रतिकारक पेशींवर (लिम्फोसाईट्सवर)
आक्रमण करतात.
एचआयव्ही संसर्गापासून एड्स होईपर्यंत 8 ते 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो.
एचआयव्ही ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते.
एड्सचा विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि तेथूनच सगळ्या जगात
पसरला, असे मानले जाते. आजपर्यंत कितीतरी व्यक्ती या आजाराला बळी पडल्या आहेत. अजूनही
एड्सवर इलाज सापडलेला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करीत आहेत.
●एचआयव्ही संसर्ग (एड्स) कोणत्या कारणाने
हाेवू शकतो :-
१)असुरक्षित लैंगिक संबंध (94%)
२)एचआयव्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक
निरोगी व्यक्तीस दिल्यास संक्रमण (0.1%)
३)एचआयव्ही संसर्गित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला
(नाळेमार्फत) (3%)
४)समलिंगी संबंधाद्वारे (1.0%)
५)दूषित सुया व सिरींजेस (0.9%)
६)इतर कारणाने (1%)
● प्रतिबंधात्मक उपाय:--
#एकापेक्षा अधिक
व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा.
#लैंगिक संबंधाच्या वेळी निरोधचा वापर करा,
#असुरक्षित यौनसंबंध
टाळा.
#तुम्हाला एचआयव्ही
संसर्ग झाला असेल तर तुमच्या साथीदाराला त्याची कल्पना द्या.
#जर तुम्ही एचआयव्ही
ने संक्रमित असाल तर रक्तदान करू नका.
#रक्त चढविण्यापूर्वी
ते एचआयव्ही मुक्त असल्याची खात्री करून घ्या.
#इंजेक्शन घेताना
प्रत्येक वेळी नवीन सुईचा वापर करा.
●जिल्हा रुग्णालय मार्फत एचआयव्ही (एड्स) समुपदेशन आणि तपासणी
केंद्र:--
◆आयसीटीसी क्र.(१):- ऐच्छिक एचआयव्ही तपासणी केंद्र
◆आयसीटीसी क्र.(२):- गरोदर मातेची एचआयव्ही तपासणी केली जाते. चाचणीत
माता पाँझिटिव्ह आल्यास प्रसूतीनंतर मातेला आणि बाळाला यावेळी नेव्हिरँपिन सिरप व गोळ्यांचा
वापर केला जातो.
◆रक्तसुरक्षा (रक्तपेढी):- स्वेच्छेने रक्तदान आणि सुरक्षित रक्त पुरवठा.
◆गुप्तरोग:- लैंगिक समस्या
◆एन्टिरिट्रोव्हायरल थेरपी (ए.आर. टी.) याच्या सेवनाने आजार नियंत्रणात
येतो पण संपत नाही.
वरील औषधांचा जिल्हा रुग्णालय,अलिबाग-रायगड
तसेच धीरूभाई अंबानी हाँस्पिटल, लोधिवली, ता.पनवेल, रायगड यांच्याकडून मोफत पुरवठा
केला जातो.
◆आयसीटीसी मोबाईल व्हँन:-ट्रक ड्रायव्हर, जेल आरोपी, स्वयंसेवी संस्थांमार्फत
आयोजित मोफत एचआयव्ही तपासणी शिबीर.इ.
● रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था,
नँको, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचआयव्ही (एड्स) जनजागृतीपर खालील
सामाजिक संस्थांची,महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या
अधिपत्याखाली रायगड जिल्ह्यात जि.ए.नि.प्र.व यु.अंतर्गत कार्यरत आहे.
१)लोकपरिषद संस्था, पनवेल,[युनिट(1)(2),
२) सामाजिक
विकास ट्रस्ट, पेण:--(ट्रकर्स आणि लिंक वर्कर,)
३)आधार ट्रस्ट
,(समक्ष रोहा, परिवर्तन, पनवेल)(मायंग्रट).
वरील सामाजिक संस्था कामगार, ट्रक ड्रायव्हर,
देहविक्रय करणाऱ्या महिलांचे आरोग्य, शिक्षण, सामाजिक प्रश्न, मुलांचे संगोपन ,शासनाने
दिलेल्या आदेशाबाबत ची माहिती देणे इ. कामे करतात.
● महाविद्यालयात "रेड रिबन क्लब"
ची स्थापना:--
युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती असल्याने राष्ट्रीय
सेवा योजना अंतर्गत युवा वर्गात एचआयव्ही (एड्स) विषयी जनजागृती व्हावी आणि कोणीही
या आजाराला बळी पडू नये, म्हणून जनजागृतीपर रायगड जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांमध्ये
रेड रिबन क्लब ची स्थापना करून
युवा वर्गात आयसीटीसी विभागामार्फत एचआयव्ही
(एड्स) बाबत माहिती सांगून शंकांचे निरसन केले जाते. तसेच त्यांची ऐच्छिक चाचणी केली
जाते.
"जागतिक एकता, सामायिक जबाबदारी!
" या घाेषवाक्याद्वारे जनतेत/युवकांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांना
जागरूक करण्यात यावे, काही शंका असल्यास अधिक माहितीसाठी १०९७ या टाेल फ्री हेल्पलाईन
क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मोबाईल मधील play store मधून NACO App. Download करावे,
असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय माने (जि.ए.नि.प्र.व यु) यांनी आवाहन केले आहे.
01 डिसेंबर जागतिक एड्स दिन ते 31 डिसेंबर दरम्यान
जनतेमध्ये तसेच युवापिढीत एचआयव्ही (एड्स) विरोधात सामाजिक द्दष्टीकोन ठेवून समृध्द
भारत घडवू या.
*एचआयव्ही/ एड्स
पासून सुरक्षित असा भारत घडविणे.
*असा भारत जिथे
प्रत्येक एचआयव्ही संक्रमित गरोदर स्री एचआयव्ही मुक्त बाळाला जन्म देऊ शकेल.
*असा भारत जिथे
प्रत्येक व्यक्तीला समुपदेशन आणि तपासणी केंद्र उपलब्ध असेल.
*असा भारत जिथे
एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठेसह आणि दर्जात्मक उपचार मिळतील.
*असा भारत जिथे
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निरोगी आणि सुरक्षित आयुष्य जगेल.
*असा भारत जिथे
एचआयव्ही ची लागण होण्याची शक्यता असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचता येईल.
*एचआयव्ही संसर्गिक
व्यक्तीसाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ, नोकरीच्या ठिकाणी सद्भावनेची वागणूक देऊ
या.
*एचआयव्ही सांसर्गिक
लोकांना माणुसकीची वागणूक देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करुन एचआयव्ही मुक्त
भारत घडवू या!
*एचआयव्ही (एड्स)
या आजारावर कोणतीही प्रतिबंधात्मक लस अथवा प्रभावी औषध नाही, त्यामुळे प्रतिबंध हाच
मुख्य उपचार आहे.
या आजाराप्रती
लोकांना सहानुभूती दाखवून
"जागतिक एकता आणि सामाजिक जबाबदारी" आपली
सर्वांची आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी आजच्या या जागतिक एड्स
दिनानिमित्त आवाहन केले आहे.
श्री.हेमकांत सोनार
प्रयाेगशाळा तंत्रज्ञ (रक्तपेढी)
जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग
(मो.क्र :-9511882578)
Comments
Post a Comment