संघर्षमय प्रगतीची वाटचाल...

 



       मी ज्योती दिपक पाटील, पेण तालुक्यातील हमरापूर येथे माझ्या पती व दोन लहान मुलींसह राहणारी एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला. नोकरी नसल्यामुळे मिळेल ते काम करून नवऱ्याच्या कमाईवर चालणारे आमचे कुटुंब. मुलींच्या शिक्षणाचा खर्च होताच..एक मुलगी पाचवीत तर दुसरी आठवीत.

 मी स्वतः गृहिणी असल्यामुळे संसाराचा गाडा जेमतेम ढकलत होतो. त्यात चांगली गोष्ट घडली की, आमच्या वाडीतील महिलांना उमेद अभियानाविषयी माहिती मिळाली आणि वाडीतील 10 महिलांनी मिळून अष्टविनायक स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन केला. नियमित बैठका होऊ लागल्या, मासिक बचत करण्यासाठी पदरमोड केलेली बचत उपयोगी आली .

  सर्व सुरळीत सुरू असतानाच माझ्यावर अस्मानी संकट कोसळले. माझ्या नवऱ्याचा अकस्मात मृत्यू झाला, माझ्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे घरखर्च, मुलींच्या पालनपोषणाचा, त्यांच्या शिक्षणाचा खर्चाचा? माहेरची व सासरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे हातभार कुणाचाच नाही. करायचं काय? डोकं सुन्न करणारे ते दिवस. पण त्यातूनही मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करीत होते. मग काहीतरी करण्याचा निश्चय केला...पण काहीही करायचे झाले तरी भांडवलाचा प्रश्न आलाच ना.. मग बचतगटामार्फत व्यवसाय करण्यासाठी उमेद अभियानांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अस्मिता योजने विषयी तालुका व्यवस्थापक शितल माळी व श्रीमती प्रीती पाटील (प्रभाग समन्वयक-पेण ) यांच्याकडून माहिती मिळाली.

  बचतगटाच्या महिलांनी मासिक बैठकीमध्ये मला पाठिंबा देवून बळ दिले. मी व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात सर्वांशी चर्चा केली आणि मग अस्मिता योजनेबरोबरच शिवणकामही  चालू करायचे ठरविले.  शिवणक्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला. हाताशी दोन मुली असल्याने बाहेर जाऊन काही करण्यापेक्षा घरच्याघरीच काहीतरी करावे जेणेकरून मुलींची अबाळ होणार नाही यासाठी हा पर्याय मला योग्य वाटला.

     शिलाई मशीन घेण्यासाठी बचतगटातून भांडवल देण्यास सर्वांचे एकमत झाले आणि प्रशिक्षण पूर्ण करून व्यवसाय सुरू झाला. व्यवसायासाठी लागणारी मदत अपुरी होती म्हणून गटाने आरडीसीसी बँकेकडे कर्जाची मागणी केली. बँकेकडून कर्ज मिळाले आणि मी त्यातून शिलाई मशिन खरेदी केली. बचतगटातील महिलांनी व आजूबाजूच्या वाडीतील महिलांनी देखील कपडे शिलाईची कामे देऊन माझ्या संसाराला हातभार लावला. बचतगटाच्या माध्यमातून मी जे काही करू शकले त्याचे मोल खूप मोठे आहे. आता माझी परिस्थिती हळूहळू बदलत गेली, मुलींचे शिक्षण मी करू शकते.

      आज उमेद अभियानामुळेच मी माझ्या अडचणींवर, परिस्थितीवर मात करून खंबीरपणे उभी आहे.

 

(मनोज शिवाजी सानप)

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज