“ एक पाऊल…समृद्धीकडे”

 

यशकथा क्र.7                                                                 दिनांक :- 17/02/2021



     आमच्या आई एकविरा स्वयंसहाय्यता महिला समूहाची स्थापना दि. 02 सप्टेंबर 2013 रोजी झाली. सुरुवातीस प्रत्येकी रु.100 प्रमाणे सभासद फी गोळा करण्यास सुरुवात केली.  ती बचत अल्प व्याज दराने गटातील महिलांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गट स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेमध्ये जोडला गेला. गट स्थापन झाला, बचत जमा व्हायला लागली पण पुढे काय..? हा प्रश्न आम्हाला सतावत होता...

  मग तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पेणच्या तालुका व्यवस्थापक शितल माळी व श्रीमती प्रीती पाटील (प्रभाग समन्वयक-पेण ) यांच्या सहकार्याने सर्व महिलांनी मिळून पापड व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले.

   व्यवसाय सुरू तर केला परंतु अनुभव हाताशी नव्हता. मग  जमेल तिथून मार्गदर्शन व अनुभवाचे बोल मिळवून व्यवसाय सुरू केला. कष्टकरी व शेतकरी वर्गातील आम्ही महिला एकत्र येऊन घरातील आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी तसेच घरातील आर्थिक परिस्थितीला थोडाफार हातभार लागावा, या उद्देशाने सुरू केलेला व्यवसाय यशस्वी व्हावा व बाहेरील जगाशी आमच्या व्यवसायाची नाळ जोडली जावी याकरिता प्रयत्न करू लागलो.    

    आजच्या आधुनिक युगात स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने ऑफिसला जाते. वेळेअभावी पापड बाहेरून विकत घेणे, हा योग्य पर्याय निवडून आणि त्यातल्या त्यात घरगुती व बचतगटातील उत्पादनाकडे कल जास्त असतो आणि हीच गरज ओळखून आम्ही आमच्या पापड व्यवसायाला सुरुवात केली.

 कच्चा माल, भांडवल यांचा अभ्यास करून व्यवसाय सुरू केला पण बनविलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळविणे देखील तितकेच महत्वाचे होते. त्यात शिक्षणाचा अभाव, ग्रामीणभाग, लोकांची मानसिकता, मार्केटिंग, पॅकिंग, लेबलिंग कशी करावी? ही आव्हाने समोर होती. मग याकरिता गटातील चार महिलांनी ट्रेनिंग घेतली आणि मग त्यांच्या सहकार्याने आम्ही मार्केटिंग टीम तयार केली. जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. कुणी घरोघरी फिरल्या, कोणी आठवडा बाजार तर कोणी दुकानं.  सामूहिकरित्या माल तयार करणे, पॅकिंग करणे,अशी कामे सुरू होतीच. आम्ही रु.10 हजार भांडवलापासून कामाची सुरुवात केली, पण आता आमच्या पापडांसाठी मागणी वाढू लागलीे. कारण मागणीबरोबरच पापडांचे प्रकारही वाढले (जसे की,सुरमई पापड, सुकट पापड, कोळंबी पापड, मिरगुंड, पोहा, नाचणी, कोथिंबीर इत्यादी. पापड) आणि आता 3 लाख रु.भांडवलाची गरज आहे. हे भांडवल आम्ही उभे करू शकलो ते केवळ महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जीवनोन्नतीअभियानात सामील झाल्यामुळेच.आम्हाला बँकेकडून अगदी कमी त्रासात सहज कर्ज उपलब्ध झाल्यामुळेच.

आज आम्ही समूहातील सर्व महिला स्वबळावर व्यवसाय करीत आहोत. त्यामुळेच आमची वैयक्तिक, आर्थिक,परिस्थिती बदलली आहे. मुलांच्या शिक्षणासाठीही मदत झाली व स्वतः मध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडला. हे सगळं करीत असताना आम्ही कधीही कोण काय बोलेल, याचा विचार केला नाही.  बचतगटाच्या माध्यमातून सामूहिकरित्या काम करीत असल्यामुळे आणि उमेद अभियानामध्ये सहभागी असल्यामुळेच आम्ही हे  साध्य करू शकलो यात काही शंकाच नाही.आणि उमेदमुळेच आम्ही महिला गरुडझेप घेवू शकलो, हे नक्कीच .

 

(मनोज शिवाजी सानप)

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज