प्रामाणिक प्रयत्न, आत्मविश्वास, चिकाटी अन् जिद्दीने अष्टविनायक महिला बचतगटाने मिळविले यश

 

यशकथा क्र.6                                                                 दिनांक :- 17/02/2021



 

  बऱ्याचदा आर्थिक अडचणीच्यावेळी महिलांना कौटुंबिक व इतर आर्थिक गरजा भागविण्याकरिता पैशांची गरज भासते. त्यावेळी त्यांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नाही, अशा वेळी प्राथमिक गरजा पूर्ण करणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असते. मग कुठून तरी उसनवारी करून गरज भागविली जाते. पण त्याची परतफेड करतानाचे प्रयत्न कधी-कधी जीवघेणे ठरतात.

 ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन स्वयंसहाय्यता समूहाची स्थापना करून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मार्ग बदलून समाजावर आधारित शाश्वत उपजिविकेची तरतूद केली. यासाठी तालुका व्यवस्थापक शितल माळी व श्रीमती प्रीती पाटील (प्रभाग समन्वयक-पेण ) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

ही यशोगाथा आहे अष्टविनायक महिला समूहाची. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत समूहाची स्थापना झाली. RDCC-बँकेत समूहाचे खाते उघडण्यात आले होते. दरमहा प्रत्येकी 100 रु. प्रमाणे मासिक बचत गोळा करून ती बचत अल्प व्याजदराने अंतर्गत कर्ज स्वरूपात दिली जात होती. आता हा समूह महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला जोडला गेला आहे.  या समूहाचे दशसूत्री प्रशिक्षण तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पेणकडून घेण्यात आले आणि नियमित बचत, नियमित सभा, नियमित कर्ज वाटप सुरू झाले.   

  मग शाश्वत उपजीविका यावर महिलांसोबत माझी वारंवार सखोल चर्चा झाली. आणि महिलांची व्यवसाय करण्याची तयारी झाली.भाजीपाला व वाल लागवड हा व्यवसाय सुरू केला. सामूहिक व्यवसाय सुरू करायचा म्हणजे भांडवल कुठून आणणार? हा प्रश्न. मग माझ्या मार्गदर्शक प्रीती पाटील-प्रभाग समन्वयक पेण यांच्या मार्गदर्शनाने सुमतीबाई सुकळीकर योजनेंतर्गत एचडीएफसी बँकेकडून रु.1 लाख 65 हजार चे.कर्ज मिळाले व व्यवसाय सुरू झाला.

 पावसाळा संपल्यानंतर 1 एकर जमिनीत वालाची पेरणी केली. किटकनाशक व खताची गरज नसल्यामुळे हे पीक फायदयाचे होते. त्याच्या जोडीला इतर भाजीही लावण्यात आली. साधारणत: 3 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शेंगा काढणीसाठी सर्व महिला जबाबदारीने काम करू लागल्या. उत्पादन चांगलं झालं. गावात व तालुक्याला माल विक्रीसाठी जावू लागला व त्याचबरोबर शेंगा सुकवून वाल काढायला सुरुवात झाली. कमी गुंतवणूकीतून बँक कर्जाचे हप्ते फेडून चांगला नफा मिळाला. जो समाज, कुटुंबातील इतर सदस्य व्यवसाय सुरू करताना टीका करीत होते, आता त्यांच्याकडूनच कौतुकाची थाप मिळू लागली.

  या यशाबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड-अलिबाग कडून ‘हिरकणी पुरस्कार 2020’ या पुरस्कारानेही समूहाला गौरविण्यात आले. महिलांचा समाजामध्ये मान वाढल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला व महिला सक्षम बनल्या.गावातील इतर महिलांची अभियानात सहभागी होण्याची तगमग सुरू झाली. आणि उमेद अभियानाची चळवळ यशस्वी होताना दिसू लागली. अभियानात सहभागी झाल्यामुळे काबाड कष्टकरी व शेतकरी वर्गातील महिला आज एकत्र येऊन स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून सक्षम बनल्या आहेत, बचतीच्या सवयी बरोबरच त्यांना स्वयंरोजगाराची प्रेरणा मिळाली आहे. बचतगटाच्या माध्यमातून व्यवसायाची नाळ जोडून स्वतःचा आर्थिक विकास कसा साध्य करता येऊ शकतो, हे महिलांनी दाखवून दिले आहे. (उमेद) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा मला अभिमान आहे हे नक्कीच.

 

(मनोज शिवाजी सानप)

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

00000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज