चला होवू जलसाक्षर…!
विशेष लेख क्र.12
दिनांक:-19
मार्च, 2021
वाढती लोकसंख्या,
वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याचा अनिर्बंध उपसा वाढल्यामुळे पाणीसाठे
कमी होत आहेत, त्यातच पावसाचे अत्यल्प प्रमाण, ऋतूमानातील अनिश्चित बदल यामुळे
देशातील अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यावर मात करून
पाण्याच्या बाबतीत भविष्यकाळ सुरक्षित करावयाचा असेल तर जलसंवर्धन व पाणीबचत ही
काळाची गरज आहे. यासाठी “जलसाक्षरता” हा महत्त्वाचा घटक आहे.
आपणास ज्ञात आहेच की, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती
आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी व सजीव
सृष्टीच्या उत्कर्षासाठी पाणी हाच मूलभूत व अत्यावश्यक घटक आहे. यासाठी आता
पाण्याचा काटकसरीने वापर, विहिरी-तलावाचे पुनर्भरण, पावसाचे पाणी साठविणे, उपलब्ध
पाणी व पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब वापरात आणणे व त्याचे नियोजनपूर्ण जतन
करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असून यासाठी प्रत्येकाने सामाजिक
जबाबदारी म्हणून प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
पाणी संवर्धनासाठी हे करूया:-
Ø बागेसाठी व शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर.
Ø सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डयांची निर्मिती.
Ø बोअरवेल रिचार्ज करून पाण्याचे पुनर्भरण.
Ø कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया.
Ø नदी-नाले, विहिरी-तलाव, झरे हे जीवसृष्टीला जगविणारे
पाण्याचे स्त्रोत आहेत त्यांचे रक्षण व देखभाल.
काही शाळांमधून विशिष्ट
दिवशी विद्यार्थी पाणी बचतीसाठी स्वतःबरोबर इतरांनाही प्रवृत्त करीत आहेत तर पेण
तालुक्यातील अनेक गावांमधून “पाऊस पाणी संकलन” चा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. पोलादपूर व म्हसळा
तालुक्यातही काही कुटुंबानी “रेन वॉटर हार्वेस्टिंग” संकल्पना स्वीकारुन करून पाणी बचतीसाठी पुढाकार
घेतला आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून
जिल्ह्यात जलसंवर्धन व पाणीबचत या विषयावर जनजागृती करण्याचे विविध प्रकारे
प्रयत्न केले जात असून रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा कु. योगिता पारधी, उपाध्यक्ष
श्री.सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) डॉ.ज्ञानदा फणसे व इतर सर्व पदाधिकारी,
अधिकारी-कर्मचारी यांच्यामार्फतही जलसंवर्धन व पाणीबचत यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना
मोलाची साथ व मार्गदर्शन मिळत आहे.
चला तर मग..
जलसंपत्तीच्या रक्षणासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होवू या..! जलसाक्षर होवू या…!
लेखन संपादन
श्री.सुरेश पाटील
श्री.मनोज शिवाजी सानप
माहिती शिक्षण व संवाद तज्ञ जिल्हा
माहिती अधिकारी
रायगड जिल्हा परिषद अलिबाग
जिल्हा माहिती कार्यालय,
रायगड अलिबाग
०००००००
Comments
Post a Comment