आदिवासी कातकरी समाजाच्या उत्थानाची जबाबदारी सर्वांची - विभागीय आयुक्त विलास पाटील
अलिबाग,दि.22(जिमाका):- समाजातील
सर्वच वंचितांसाठी नियोजनबद्ध व कालबद्ध उत्थान कार्यक्रमाची गरज आहे, आदिवासी
कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे
प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील यांनी आज पनवेल येथे केले.
पनवेल मधील
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग
यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.
महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील "कातकरी उत्थान" अभियानांतर्गत
"सप्तसूत्री" कार्यक्रमाद्वारे विविध योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम
संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील हे होते तर
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे आणि पनवेल
महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते हे लाभ वाटप करण्यात आले.
यावेळी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, पनवेल
उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, श्रीवर्धन
उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, कर्जत तहसिलदार विक्रम
देशमुख, खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, गटविकास
अधिकारी संजय भोये, तालुका कृषी अधिकारी श्री.चौधरी, जिल्हा परिविक्षा अधिकारी
अशोक पाटील, बाल संरक्षण अधिकारी चेतन गायकवाड, तहसील कार्यालयाचे विनोद लचके व
इतर अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
विभागीय
आयुक्त विलास पाटील पुढे म्हणाले की, कातकरी बांधवांमधील युवक-युवतींना स्पर्धा
परीक्षा मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. माणूस शिक्षणाने नक्कीच मोठा होतो. आपण
जन्माने जरी सामान्य परिस्थितीत जन्मलो असलो तरी शिक्षण घेऊन, मेहनत करून आपण आपली
सामान्य परिस्थिती बदलू शकतो. जीवनात निरोगी आरोग्याचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
यासाठी आरोग्य तपासणी नियमित होणे गरजेचे आहे. आदिवासी बांधवांमधील स्थलांतरण
थांबायला हवे आणि यासाठी या आदिवासी,कातकरी बांधवांना शाश्वत रोजगार मिळवून
देण्यासाठी, उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन बांधील आहे.
आपले मनोगत
व्यक्त करताना कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी श्री.पाटील अतिशय भावूक झाले. या अनाथ
मुलांच्या भवितव्याचे काय? या विचारांनी त्यांनी काळजी व्यक्त केली. मात्र जिल्हा
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या मुलांचे पालकत्व स्वीकारले असल्याचे समजताच त्यांनी
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांचे विशेष
कौतुक केले.
आजच्या
काळात इतर व्यसनांसह मोबाईलच्या व्यसनापासूनही लांब राहणे गरजेचे असल्याचे सांगून
विभागीय आयुक्त श्री.पाटील म्हणाले की, गोरगरीब वंचितांसाठी वेळात वेळ काढून
त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध राहूया. त्यांच्या समस्या
सोडविण्यासाठी प्रयत्न करुया. शेवटी श्री.पाटील यांनी पनवेल, उरण, खालापूर, कर्जत
या भागातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कातकरी बांधवांना आवाहन केले की,
लसीकरण करून घ्या. आरोग्याची काळजी घ्या. प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे. नोकरी
करा, छोटे-मोठे व्यवसाय करा, मोठे व्हा. आपल्या मुला-बाळांना चांगले संस्कार द्या.
आपली मुलेही आपले नाव कमावतील,या विश्वासासह सतत प्रयत्नशील राहा.
कार्यक्रमाची
सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
आपल्या
प्रास्ताविकपर भाषणात पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके यांनी कातकरी
उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्रीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात तसेच पनवेल व
कर्जत महसूल उपविभागात झालेल्या विविध उपक्रमांविषयीची सविस्तर माहिती दिली.
या
कार्यक्रमाच्या निमित्ताने कातकरी स्थलांतरण रोखणे,बालविवाह होवू नये, शिक्षण
घ्यावे याबाबत "बाहास मला सालामा मा धाड" हे लघुनाट्य सादर करण्यात आले.
त्याचबरोबर कातकरी उत्थान सप्तसूत्री कार्यक्रम, गरुड झेप स्पर्धा परिक्षा
मार्गदर्शन केंद्र आणि माझी वसुंधरा या उपक्रमांची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकांचे
प्रकाशन विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,
उपवनसंरक्षक आशिष ठाकरे आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख व इतर
मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. याशिवाय गरुड झेप स्पर्धा परिक्षा केंद्राच्या
प्रदर्शनीय दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या
निमित्ताने उपस्थित कातकरी बांधवांना कोविड आपत्तीमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या
मुलांना संजय गांधी योजना शाखेमार्फत दरमहा अर्थसहाय्य रुपये 1 हजार व अंत्योदय
योजनेंतर्गत पिवळी शिधापत्रिका वितरण, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत 20
हजार रुपये रकमेचे धनादेश वितरण, संजय गांधी योजना शाखेमार्फत कातकरी विधवा महिला
भगिनींसाठी व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दरमहा अर्थसहाय्य रुपये 1 हजार चे लाभ
वितरण, घेरावाडी माणिकगड येथील 24 कातकरी कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिका वाटप,
कातकरी नवतरुणांना निवडणूक ओळखपत्रांचे वाटप, वनपट्टे वाटप या अंतर्गत सामुहिक
तसेच वैयक्तिक 900 दावे मंजूर केले असून प्रातिनिधीक स्वरुपात पाच लाभार्थ्यांना
लाभ वाटप, जातीच्या दाखल्यांचे वाटप, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण
यांच्यामार्फत आदिवासी ढाबा चालविण्यासाठी कातकरी गटांना अर्थसहाय्य वाटप, कातकरी
बांधवांना वीटभट्टी योजनेंतर्गत अर्थसहाय्य वाटप, पंचायत समिती पनवेल तर्फे कातकरी
बंधूंना घरकुल लाभ वाटप, पनवेल तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत आदिम कातकरी
बांधवांना ट्रॅक्टर/ पॉवर टिलर/ फळबाग वाटप, महिला व बालविकास कार्यालयामार्फत
कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या बालकांना पाच लाख रुपये अनुदान वाटप प्रमाणपत्र,
अनाथ प्रमाणपत्र तसेच बालसंगोपन योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ, एकात्मिक
बाल विकास सेवा योजना पनवेल कार्यालयामार्फत पोषण पोटली, माझी कन्या भाग्यश्री,
पहिली मुलगी जन्माचे स्वागत, अनाथ प्रमाणपत्र, बालसंगोपन योजना व बेबी केअर किट
लाभ वाटप, अन्नदा संस्थेमार्फत कुपोषित बालकांना पोषण पोटली आहाराचे वाटप, कर्जत
उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत शिलाई मशीनचे वाटप अशा विविध योजनांचा
प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.
या देखण्या
कार्यक्रमाचे सुंदरसे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांनी केले
तर तहसिलदार विजय तळेकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, आदिवासी कातकरी
बांधवांचे, अधिकारी कर्मचाऱ्यांचे आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे आभार मानले.
00000
Comments
Post a Comment