राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्ताने नियोजन भवनात भूमापन दिनाचा कार्यक्रम संपन्न

 


अलिबाग,दि.11 (जिमाका):- दि.10 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने रायगड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने जिल्हा स्तरावर भूमापन दिनाचा कार्यक्रम नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे स्वागत करून दीपप्रज्वलन व मोजणी साहित्यांचे पूजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भूमापनाचे महत्व सांगून भूमी अभिलेख व महसूल विभाग यांनी एकत्र येवून सामान्य जनतेला न्याय देण्याबाबत आवाहन केले. त्याचप्रमाणे सामान्य जनतेची मोजणीची कामे, शासकीय मोजणी कामे, भूसंपादन मोजणी कामे वेळेवर पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून उपलब्ध आधुनिक मोजणी साहित्याचा वापर करण्याबाबत आग्रही सूचना केली. रायगड जिल्हा भूमी अभिलेख विभागासाठी अत्याधुनिक रोव्हर मशिन उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री.सचिन इंगळी यांनी आपल्या प्रास्ताविकात भूमापन दिनाचे महत्व व इतिहास विशद करून रायगड जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या वतीने मागील वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामाबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्याचप्रमाणे जिल्हयामध्ये राबविण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पाबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमात रायगड जिल्हयातील वेगवेगळ्या उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास MRSAC नागपूर येथील वरिष्ठ वैज्ञानिक श्री.संजय पाटील हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे पनवेल उपअधीक्षक श्री.विजय भालेराव, कर्जत उपअधीक्षक श्री.इंद्रसेन लांडे , म्हसळा उपअधीक्षक श्री.योगेश कातडे, उरण उपअधीक्षक श्री.गणेश राठोड, पाली उपअधीक्षक श्री.काशिनाथ मोरे व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अलिबाग उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री.प्रदीप जगताप यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज