शेतकऱ्यांनी भात बियाणे उगवण क्षमता चाचणी करावी --उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे
अलिबाग,दि.24(जिमाका):- खरीप हंगामात भात हे पीक महत्त्वाचे आहे. पिकाची उत्पादकता चांगली येण्यासाठी बियाणे हा घटक महत्वाचा आहे. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे गरजेचे आहे.
आपण पेरणीसाठी वापरत असलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, पेरणीसाठी किती बियाणे वापरावे हे ठरवता येते यासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी करावी.
उगवण क्षमता तपासणी प्रकार :- वृत्तपत्राच्या किंवा गोणपाटाच्या सहाय्याने- 100 भात बियाणे मोजून घेऊन ते पेपर मध्ये 10 च्या क्रमाने 10 रांगेत ठेवावे व पेपर गुंडाळून त्यावर रबर बँड किंवा भाग्याने बांधावे व त्यावर हलके पाणी शिंपडून ते सर्वसाधारण तापमानात 3-4 दिवस ठेवावे. त्यावर पाणी शिंपडून ओलसरपणा ठेवावा व 3-4 दिवसानंतर त्यास मोड आल्यावर त्यातील किती बियाणे उगवले ते मोजून घ्यावे.
बियाणे पेरणी करून- पसरट भांड्यामध्ये किंवा ट्रे मध्ये माती, शेणखत यांचे योग्य प्रमाण घेऊन 100 भात बियाणे मोजून ते पेरावे व पाणी द्यावे. 5-6 दिवसानंतर त्यातील उगवलेले बियाणे मोजून घ्यावे. 100 बियातील 92 बिया उगवल्या तर 92 टक्के उगवण क्षमता होते.92 टक्के बियाणे उगवले म्हणजे बियाणे पेरताना 8 टक्के वाढीव बियाणे आपणास पेरणीसाठी वापरावे लागेल. म्हणजेच 10 किलो बियाणे पेरायचे असेल तर 10 किलो 800 ग्रॅम बियाणे पेरावे लागेल.
तरी शेतकरी बांधवांनी बियाणे क्षमता चाचणी घरच्या घरी करावी. अधिक माहितीकरिता आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचीशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment