महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न

 


                                        

रायगड(जिमाका)दि.19:- शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व ग्रामीण प्रगती फाउंडेशन, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी मेमोरियल हॉल, निजामपूर रोड, मुंबई-गोवा हायवे जवळ, ता.माणगाव येथे जिल्ह्यातील बेरोजगार महिलांसाठी ‍विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

   यावेळी माणगाव उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार, ग्रामीण प्रगती फाउंडेशन सी.ई.ओ. मंगेश डफळे, संचालिका ज्योती डफळे, उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के उपस्थित होते.

   यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयाकडून दरवर्षी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन प्रथमच होत असून याचा आनंद होत आहे.  या रोजगार मेळाव्याला जवळपास 600 महिलांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शासनातर्फे महिला सक्षमीकरणावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून जिल्ह्यातील महिलांना शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध असून येणाऱ्या काळात कोकणात विविध रोजगार उपलब्ध होणार आहेत. शालेय स्तरावर विविध विज्ञान प्रदर्शन होत असतात. त्यातील काही उपक्रम हे नाविन्यपूर्ण व अंमलात आल्यास फायदेशीर असून जास्तीत जास्त विद्यालयात विद्यार्थ्यांना उपक्रमांबाबत मार्गदर्शन करावे अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

विविध कंपन्या, विभाग व महामंडळाना सन्मानपत्र देऊन गौरव

 तसेच या मेळाव्यात सहभागी झालेल्या संचिता मरीन प्रॉडक्ट प्रा.लि.,जॉहन कॉकरील इंडिया प्रा.,मॅक्ट्रिक्स कॅड अकॅडमी, पनवेल प्लेसमेंट रायगड, रुपेश कन्सल्टन्सी खोपोली, क्लिनेक्स हॉस्पिटॅलिटी प्रा.लि.,ग्रामीण बिझनेस टेक्नॉलॉजीस प्रा.लि., पी. डी. सोल्युशन्स, श्रीवर्धन कृषी विकास प्रॉडक्ट प्रा. लि., इंटेगा मायक्रो सिस्टम प्रा. लि., कल्पना फिल्मस अँड व्ही.पी.क्स.स्टुडिओ ई. कंपन्या व जिल्हा उद्योग केंद्र रायगड, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, आरएसइटी रायगड, जिल्हा विकास व बालविकास कार्यालय रायगड यांना  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते  सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या, विभाग व महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर नोकरी इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. तसेच स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या बेरोजगार महिलांसाठी जिल्हयातील विविध महामंडळे यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना विषयीची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले. तर आभार ग्रामीण प्रगती फाउंडेशन सी.ई.ओ. मंगेश डफळे यांनी मानले.

या कार्यक्रमाला माणगाव नगर परिषदेचे नगर सेवक, नगर सेविका, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच माणगाव तालुक्यातील बचत गटांच्या महिला, ग्रामीण प्रगती फाऊंडेशन पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक