रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मतदानासाठी यंत्रणा सज्ज ---जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे

 


रायगड,(जिमाका) दि.5:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 32-रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान येत्या 7 मे रोजी होत आहे. निवडणूक मतदानासाठी यंत्रणा सज्ज असून प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठकव्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता मंडप उभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार होईल, मतदारांनी  निर्भय होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले.

अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक मतदान पूर्वतयारीबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व पत्रकारांशी जिल्हाधिकारी श्री.जावळे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी निवडणूक पूर्वतयारीबाबत माहिती देताना, मतदार माहिती चिठ्ठीचे 98 टक्के वितरण झाले आहे असे सांगून मतदानासाठी ‘छायाचित्रासह मतदार ओळखपत्रासह’पर्यायी 12 पैकी कोणतेही एकओळखपत्र दाखवून मतदान करता येईल. तसेच लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता नागरिकांनी मतदानापूर्वी आपल्या मतदान केंद्राची माहिती घ्यावी असे सांगितले.

जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यादृष्टीने मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र स्थापित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा ॲपद्वारेही ही माहिती मिळू शकेल. मतदारांना वितरीत करण्यात येणाऱ्या मतदार माहिती चिठ्ठीद्वारेदेखील कुठे मतदान करावयाचे आहे ते कळू शकेल.

जिल्हा पलिस अधिक्षक श्री.घार्गे यांनी 15 लाख रुपये किमतीची अवैध दारु जप्त करुन 365 गुन्हे दाखल, 1462 परवाना शस्त्रे जमा तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर प्रतिबंधत्मक कारवाई केली आहे असे सांगून, पोलिस बंदोबस्त व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.

मतदान केंद्रस्तरीय मनुष्यबळाचे व्यवस्थापन

या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री 2185 मतदान केंद्रांवर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी 8740 मतदान केंद्रस्तरीय मनुष्यबळ असून  राखीव अधिकारी कर्मचारी यांचेसह पुरेसे 9771 प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. यामध्ये 3517 महिला, 47 दिव्याग अधिकारी कर्मचारी आहेत. तसेच 187 पोलीस अधिकारी, 2060 पोलिस, 1363 होमगार्ड, सीआरपीएफ 243 आणि  शिघ्र कृती दलाच्या 23 प्लाटून तैनात ठेवण्यात आल्या आहेत.  या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यांचे मतदार केंद्रावर जाणेसाठी 116 जीप व 216 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारी

16 मार्च ते 3 मे 2024 या कालावधीत जिल्ह्यात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 57 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 57 तक्रारी उचित कार्यवाही करुन निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 1568 प्राप्त तक्रारीपैकी 1540 निकाली काढण्यात  आलेल्या आहेत.तसेच आचारसंहिताबाबत 5 लेखी तक्रारी प्राप्त असुन सर्व तक्रारी नियमानुसार कारवाही करुन निकाली काढलेल्या आहे.

तसेच दूरध्वनी क्र. 1950 वर 204 तक्रारी प्राप्त झालेल्या असून 204 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान

मतदारसंघात 16 लाख 68 हजार 372 मतदार असून 8 लाख 47 हजार 763 महिला तर 8 लाख्‍ 20 हजार 605 पुरष आणि 4 तृतीयपंथीय मतदार आहेत. मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. मात्र मतदान केंद्रावर सायंकाळी 6 वाजेपर्यंत जेवढे मतदार उपस्थित असतील त्या सर्वांची  मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे मतदान केंद्र सुरु राहील. मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली असून वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या असून इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे.

मतदानासाठी पर्यायी 12 ओळखपत्रे

मतदारांनी मतदार ओळखपत्र किंवा वरीलपैकी एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे.मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या 2617 मतदारांना तसेच 414 दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. गृह मतदानाची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे सविर्ळस वोटर सह 2753 मतदारांनी गृहमतदान केले आहे. तसेच  दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये तीन सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मतदारसंघामध्ये ईव्हीएम बॅलेट युनिट 2185, कंट्रोल युनिट 2185  व  व्हीव्हीपॅट 2185 मशीन्सचे कमिशनिंग (Commissioning) करण्यात आले आहे.

सर्व 2185 मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठकव्यवस्था, 1949 ठिकाणी पाळणाघर, उन्हाळा लक्षात घेता सावली साठी 550 मतदान केंद्राच्या ठिकाणी मंडप, आणि मतदारांच्या मदतीसाठी 18 वर्षाखालील 2921 स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक