अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यानी काळजी घ्यावी--उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे

 

 

रायगड,दि.10(जिमाका):- सद्यस्थितीत भात पिकाची लागवड सर्वत्र सुरु आहे. जुलै महिन्यात बऱ्याच वेळा पावसाची तीव्रता वाढते, त्यामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण होते अशावेळी रोपवाटिकेतील रोपांना अथवा लागवड केलेल्या भात पिकांच्या रोपांना हानी पोहचू शकते,त्यामुळे नुकसान संभवते. अतिपर्जन्यवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे.

रोपवाटिकेतील क्षेत्रात तसेच भात खाचरामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. अति पावसात भात/ नाचणी रोपांची लागवड टाळावी किंवा पुढे ढकलावी. शेतालगतचे प-हे/नाले/मोऱ्या जास्तीत जास्त मोकळ्या करुन पाण्याचे वहन त्वरित कसे होईल, याची काळजी घ्यावी. रोपवाटिका गादी वाफ्यावर केली असेल तर त्यांच्यामधील चारी खोल करून पाणी निचरा होईन असे पहावे, रोपे जर राबावर सपाट वाफ्यात केली असल्यास चारी काढून शेतातील पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पुनर्लागवड केलेल्या भात आणि नाचणी खाचरातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. भात रोपे दोन दिवसांपर्यंत पाण्यात सापडल्यास पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर दाणेदार युरिया खताचा हलका हप्ता द्यावा. भात रोपांचे वय जास्त झाल्यास म्हणजेच 30 दिवसांपेक्षा जास्त वयाची रोपे लागवड करावयाची असल्यास प्रत्येक चुडामध्ये रोपांची संख्या वाढवावी. भाजीपाला आणि नवीन लागवड केलेल्या फळझाडांमध्ये पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था करावी. पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधण्याची त्यांना हिरवा चारा आणि स्वच्छ मुबलक पाणी देण्याची व्यवस्था करावी. कुक्कुटपालनाच्या ठिकाणी हवामान उबदार राहण्यासाठी विजेचे बल्प लावण्याची व्यवस्था करावी.

अधिक माहितीसाठी आपले कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

00000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज