11 फेब्रुवारीपासून 12 वी तर, 21 पासून 10 वीची परीक्षा परीक्षा केंद्रांवर गैर प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार - राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर
रायगड, दि.5 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) दिनांक 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा दि. 11/02/2025 ते दि. 18/03/2025 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा दि. 21/02/2025ते दि. 17/03/2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली इ.12 वी व इ. 10 वीच्या परीक्षा कॉपीमुक्त,भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्र प्रणालीव्दारे बैठक घेण्यात आली.
या दूरचित्र प्रणालीमध्ये मुख्य सचिव यांनी यावर्षी होणाऱ्या इ. 12 वी व इ. 10 वी परीक्षांच्या धर्तीवर कॉपी प्रकरणास पूर्णत: प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचान्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची फेसीयल रिकगनायझेशन यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येईल.महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंध कायदा 1982 या कायद्याची अंमलबजावणी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास, गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.
सर्व उपाययोजना करण्यात येणार असून, याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व घटक यांनी नोंद घ्यावी.
0000000
Comments
Post a Comment