राजकीय पक्षांनी यादीभाग निहाय बीएलए यांची नेमणूक करावी--- जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड,दि.20(जिमाका):- मतदार याद्या अचूक व दोषविरहित असणे आवश्यक आहे. मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. तरी राजकीय पक्षांनी यादीभाग निहाय बीएलए यांची नेमणूक करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
मतदार याद्या तयार करणे त्यांचे पुनरिक्षण व अद्यावतीकरण करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षाशी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करुन त्यांच्या सूचना घेण्याच्या अनुषंगाने (दि.19 मार्च ) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे आदि उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले की दि.19 मार्च 2025 रोजी रायगड जिल्हयामध्ये पुरुष मतदार 12 लाख 8 हजार 926, स्त्री मतदार-12 लाख 52 हजार 340 तर तृतीय पंथी मतदार 95 असे एकूण मतदार संख्या 25 लाख 33 हजार 361 इतकी आहे. या सर्व मतदार यादीभागाचा बीएलओ व राजकीय पक्ष यांनी नेमलेले बीएलए यांच्यामार्फत मतदार यादी पडताळणी केली जाईल. यामुळे यादीतील मयत, स्थलांतरीत, दुबार मतदारांची वगळणी करणे, मतदारांच्या तपशीलात दुरुस्ती करणे अधिक सुलभ होईल. सर्व राजकीय पक्षांनी या कामास प्राधान्य द्यावे असेही त्यांनी सांगितले.
मतदार नोंदणी ही एक निरंतर प्रक्रीया आहे. 01 जानेवारी, 01 एप्रिल, 01 जुलै व 01 ऑक्टोबर या चार अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी अद्यावत केली जाते. ज्या मतदारांचे अर्हता दिनांकाला 18 वर्षे पूर्ण होत नसली तरी पुढील अर्हता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण होत असतील तर सदर नवीन मतदाराकडून फॉर्म नमूना नंबर 6 भरुन घेतला जातो व अर्हता दिनांकाला 18 वर्ष पूर्ण होताच सदर फॉर्मवर प्रोसेस केली जाते. मतदार नोंदणी ही ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने केली जाते.
फॉर्म न.6 - नवीन मतदार नोंदणी फॉर्म 6 ए अनिवासी भारतीय, यांची मतदार नोंदणी, फॉर्म नं.7 - मयत स्थलांतरीत दुबार नावांची वगळणी, फॉर्म. नं 8 नांव, फोटो, रहिवास पत्ता इ. मतदारांच्या तपशीलामध्ये बदल याबाबत लोकप्रतिनिधी 1950 व मतदार नोंदणी नियम 1960 तरतूदीनुसार पडताळणी करुन नवीन मतदारांची नोंदणी, बदल व वगळणी करण्यात येते.
मतदार नोंदणी ही संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन पध्दतीने अर्ज भरुन व Voter Helpline अॅपद्वारे/Voter Service Portal यावर ऑनलाईन मतदार नोंदणी करता येते.
000000
Comments
Post a Comment