चला हात स्वच्छ धुवू.. करोनाला हरवू …!

 

विशेष लेख क्र.31                                                                                         दिनांक :- 14 ऑक्टोबर 2020

 



 

  दरवर्षी दि.15 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जातो.  स्वच्छतेविषयी जाणीवा समृद्ध  व्हाव्यात व सुदृढ आरोग्यदायी जीवनासाठी हात धुण्याविषयी प्रभावी जागृती होण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे.  रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायतीमध्ये हात धुण्याची मोहीम सोशल डिस्टंसिंग ठेऊन केली जाणार आहे.  नेहमी स्वच्छ हात धुवा व निरोगी राहा असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

करोनाची साथ जगभरात थैमान घालत आहे.  याचा प्रतिबंध करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना व शासकीय आरोग्य यंत्रणेकडून मुख्य उपाय सांगितला जातो तो म्हणजे हात धुवा.  साधा उपाय सर्दी, खोकला, फ्लू , स्वाइन फ्लू व झाला करोना विषाणू टाळण्यासाठी सांगितला जातो.  विशेषत: श्वसनमार्गाला आणि पचनसंस्थेला बाधित करणाऱ्या वायरस आजाराला टाळण्यासाठी हा रामबाण उपाय समजला जातो.  निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी सवयी असलेली व्यक्ती दीर्घ आणि सुखी जीवन जगते.  आपल्याला होणाऱ्या अनेक आजारांचे मूळ हे अस्वच्छ हातामध्ये असते. अशुद्ध व अस्व्च्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्याने, खाल्ल्याने अनेक जीवणू आपल्या पोटात जातात.  त्यातून विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळते म्हणून हाताच्या शुद्धीबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

हात कधी धुवावेत : स्वयंपाकाची तयारी करण्यापूर्वी, जेवणापूर्वी व जेवणानंतर,  जेवायला वाढण्यापूर्वी, शौचालयात जाऊन आल्यावर, आजारी व्यक्ती भेटल्यानंतर, खोकला, सर्दी झाल्यावर, नाक स्वच्छ केल्यानंतर, प्राण्याला हात लावल्यानंतर, केरकचरा काढल्यावर, बाहेरून आल्यानंतर, पैसे मोजल्यावर, केस विंचरल्यावर, सार्वजनिक वस्तूला हात लावल्यानंतर.

 जगभरात शाळकरी मुलांमध्ये हगवणीसारखे पोटाचे विकार अधिक प्रमाणावर आढळतात, याला कारण म्हणजे मुले अन्न खाताना हात स्वच्छ धूत नाहीत.  हात स्वच्छ न करता अन्नग्रहण केल्यामुळे पोटामध्ये विविध जंतू जाऊन होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी 35 लाख मुले दगावतात, असा निष्कर्ष काही अभ्यासकांनी नोंदविला आहे.  हात स्वच्छ असतील तर श्वसनाचे व पचनाचे विकार यांचे प्रमाण कमी होते. युनिसेफने याचा प्रचार करण्यासाठी विकसशील देशात अनेक उपक्रम राबविले आहेत.

 हात किती वेळ कसे धुवावेत :- शास्त्रीयदृष्ट्या किमान 20 ते 60 सेकंद हात चोळून  मग पाण्याने धुवावेत. यासाठी हात ओले करून घ्यावेत, मग हाताला पुरेसा द्रव साबण किंवा साबण डी लावून दोन्ही हात एकमेकात गुंतवून दोन्ही हाताला चोळून घ्यावा.  सगळीकडे नीट साबण लावल्यावर दोन्ही हाताचे तळवे, बोट, नखे हे सर्व चांगले चोळावे. बोटाच्या साध्यांचा भागातही  चांगले चोळावे त्यानंतर पाण्याने हात स्वच्छ धुवावेत आणि स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसून घ्यावेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयानुसार वीस ते पंचवीस सेकंद हात चोळले तर कीटक नष्ट होतात.

हाताची स्वच्छता ही आपल्या शारीरिक स्वच्छतेची पहिली पायरी आहे. हातापासूनच तर आपण रोजच्या कामांना सुरुवात करतो.  त्यामुळे स्वच्छतेच्या गोष्टी पुन्हा आपल्या अंगी बाळगा, आपल्या मुलांना शिकवा, त्यामुळे मुलांचे आणि आपले आरोग्य आपल्याच हातात राहील.  चला तर मग निर्धार करू या नियमित हात धुण्याचा-नियमित सदृढ राहण्याचा.

 

सुरेश पाटील

माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ

जिल्हा परिषद रायगड

मो.9881712585

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन