खेळामध्ये यश संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक :- 20 सप्टेंबर  2016                                                      वृत्त क्र. 610

खेळामध्ये यश संपादन करण्यासाठी
सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक
                                                  --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले



अलिबाग दि.20 :-  प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे तशी ती क्रीडा क्षेत्रातही आहे.  खेळामध्ये यश संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे 20 व 21 सप्टेंबर रोजी या दोन दिवसीय आयोजित करण्यात आलेल्या  राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेचे उद्घाटन  जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या  हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी भारतीय वेटलिफ्टींग संघटना महासचिव संतोष सिंहासने,  क्रीडा व युवक सेवा मुंबई उपसंचालक एन.बी.मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, रायगड जिल्हा वेटलिफ्टींगचे अध्यक्ष प्रशांत साळुके, पंच श्री.तोडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशातील खेळाडूंनी पदके प्राप्त केली आहेत.  ऑलिम्पिक पदक  मिळविणे हे खेळाडूच्या 10 ते 15 वर्षाच्या तपश्चर्येचे ते फळ असते.   ज्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात आपले करिअर करण्याचे ठरविले आहे त्यांनी आपल्या खेळातील सर्वोच्च नैपुण्य प्राप्त करावे.    राज्यस्तरीय  स्पर्धेमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेत खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी असे सांगून त्यांनी सर्व  स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. 
आज होणारी राज्यस्तरीय शालेय स्पर्धा महत्वाची आहे.  या स्पर्धेमधून तेलगंणा राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी संघाची निवड करण्यात होणार आहे असे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी सांगितले. 
या स्पर्धेंमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक,लातूर,मुंबई, पुणे, कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ अशा एकूण 9 विभागातून जवळपास 350 खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या प्रारंभी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला.   तर  शिवानी मोरे हीने स्पर्धेतील खेळाडूंना शपथ दिली. 
तसेच कोल्हापूर विभागाकडून बाबू कोळेकर, शिवछत्रपती क्रीडापीठाकडून मोहिनी चव्हाण हे राष्ट्रीय पदक विजेते तर रायगड जिल्ह्याचा प्रणित साळुंखे हा गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत नेतृत्व केलेला खेळाडू सहभागी झाले आहेत.   क्रिडा अधिकारी धनश्याम राठी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 0000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज