प्रवाशांच्या सुखकर व आनंददायी प्रवासासाठी केंद्र शासन कटिबध्द ---रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

दिनांक:- 3/12/2016                                                                                          वृत्त क्र. 773
            प्रवाशांच्या सुखकर व आनंददायी प्रवासासाठी
केंद्र शासन कटिबध्द
                                            ---रेल्वेमंत्री सुरेश प्रभू


अलिबाग, दि.03 :- (जिमाका) कोकणातील बहुतांशी लोक मुंबईत राहत असून ते नेहमी कोकण रेल्वेने प्रवास करीत असतात.  यासाठी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व आनंददायी  व्हावा यासाठी केंद्र शासन कटिबध्द  असल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री  सुरेश प्रभू यांनी आज येथे केले.   
माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील हॉल्ट स्थानकाचे  क्रॉसिंग स्थानकामध्ये परिवर्तन, महाड तालुक्यातील सापेवामने हॉल्ट स्थानकाचे क्रासिंग स्थानकामध्ये (रिमोटद्वारे) परिवर्तन व भुमिपुजन आणि कोनिशीला अनावरण त्यांचेहस्ते करण्यात आले त्यावेळी  ते बोलत होते.     यावेळी केंद्रीय अवजड व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत, आमदार भरत गोगावले, माणगाव पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अलका केकाणे, इंदापूर ग्रामपंचायतीच्या सरंपच श्रीमती स्वाती नवगणे, कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता, माणगावचे उपविभागीय अधिकारी विश्वनाथ  वेटकोळी आदि मान्यवर उपस्थित होते.
            याप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री महोदय सुरेश प्रभू म्हणाले की, कोकण रेल्वेचा विकास व्हावा आणि कोकण  रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळून  देण्याचा प्रयत्न केला जात आहे.  या दोन्ही ठिकाणी वेटींग हॉल, करंट तिकीट बुकींग  व अन्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.  तसेच कोकण रेल्वे मार्गावर   हमसफर ही अतिजलद गाडी सुरु करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   रेल्वे स्थानकांमध्ये नवीन प्लॅटफॉर्म  वाढविले जाणार असल्याने त्याचा निश्चितच लाभ जनतेला होणार आहे.  वसई,विरार व पनवेल हा नवीन कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.कोकणात रेल्वेचे पार्ट बनविण्याच्या कारखान्याची  निर्मिती करण्यात येणार आहे.  त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून कोकणातील बचत गटांनी  उत्पादित केलेल्या  मालाला बाजार पेठ  उपलब्ध करुन  देण्याचाही प्रयत्न केला जाईल.  रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या मोकळया जागेत  उद्याने तयार करावीत.  या उद्यानाचा लाभ येथील वयोवृध्द नागरिक, मुले, महिलांना होईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीयमंत्री अनंत गीते  म्हणाले की, माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील हॉल्ट स्थानकाचे  क्रॉसिंग स्थानकामध्ये परिवर्तन व महाड तालुक्यातील सापेवामने हॉल्ट स्थानकाचे क्रासिंग स्थानकामध्ये परिवर्तनामुळे येथील पंचक्रोशीतील नागरिकांना व कोकण वासियांना याचा निश्चितच लाभ  होणार आहे.  पनवेल ते रोहा दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर  असून कोलाड ते वीर पर्यंतच्या दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु  होणार आहे.   पेण ते अलिबाग व अलिबाग थेट मुंबईला जोडले जावे आणि आरसीएफच्या रेल्वे रुळावरुन प्रवासी वाहतूक  करता येइल का ते पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या प्रास्ताविक कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांनी या दोन प्लटफॉर्मवर होत असलेले परिर्तन व येणारा खर्च याबाबतची सविस्तर  माहिती सांगितली. कार्यक्रमास विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कोकण रेल्वेचे वरिष्ठ  अधिकारी तसेच इंदापूर पंचक्रोशीतील नागरिक, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत