वाहन चालविणे हे एक व्रत - जेष्ठ कवी प्रा.प्रवीण दवणे

दिनांक:- 23/01/2017                                                                                                     वृत्त क्र.44
वाहन चालविणे हे एक व्रत
- जेष्ठ कवी प्रा.प्रवीण दवणे

अलिबाग दि.23 (जिमाका) कोणतेही वाहन चालविताना जेव्हा आपण त्याचा परवाना घेतो. त्यावेळी चालक होणे हे एक व्रत आहे, असे समजून त्याचा स्विकार करावा व हे व्रत सदोदित अंगीकारावे. यामुळे  स्वत:ची व समाजाची सुरक्षा राखली जाईल असे प्रतिपादन जेष्ठ कवी प्रा.प्रवीण दवणे यांनी आज पनवेल कळंबोली येथे केले.
कळंबोली येथील परिवहन विभागाच्यावतीने आयोजित 28 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवड्याच्या सांगता समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, तसेच परिवहन अधिकारी दिपक उगले आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
                पुढे मार्गदर्शन करताना प्रा.दवणे म्हणाले की, रस्ता सुरक्षा हा  केवळ सप्ताह अथवा पंधरवड्याचा विषय नसून तो कायम स्वरुपी गांर्भीयाने घेण्याचा विषय आहे. कोणतेही वाहन चालविताना त्या वाहनाची सुरुवात करतानाची तुमची देहबोली ही तुमची मनबोली होते. आणि त्यातूनच त्याचे कौशल्य दिसून येते. म्हणूनच कोणत्याही वाहनाचा चक्रधारी-चालक होत असताना त्यास एक व्रत म्हणून स्विकारले तर त्याचे फळ उचित व लाभदायी मिळते. नियमांचे पालन करणे, नियमांचे आचरण करणे याबाबी महत्वाच्या आहेतच. नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग तसेच सी.सी. टी.व्ही. च्या माध्यमातून वाहन चालकांवर नजर असते पण हा सी.सी.टी.व्ही. वाहन चालकाच्या ह्दयात व सदसदविवेक बुध्दीत असणे महत्वाचे आहे. म्हणूनच नियमांचे पालन कायद्या सोबतच स्वत:साठी ही करा. आणि समाजाची सुरक्षा करा.
या रस्ता सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमास मी अन्य कोणासाठी न येता स्वत:साठी आलेलो आहे. कारण रस्त्यावर  वाहना सोबतच पादचारी देखील जात असतात. त्यांची ही सुरक्षितता महत्वाची असते म्हणून त्यांचा प्रतिनिधी या नात्याने  उपस्थित आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
                तर रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरीकाची महत्वाची जबाबदारी असून ज्यांना-ज्यांना याबाबतच्या कायद्यांची, नियमांची माहिती आहे. त्यांनी समाजात सर्वत्र रस्ता सुरक्षा दूत म्हणून काम पहावे व समाजाची सुरक्षा जपावी असे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी सांगून रस्ता सुरक्षा विषयक पंधरवड्यात पनवेल परिवहन विभागाने केलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
 आपल्या प्रास्ताविकेतून उपप्रादेशिक परिवहन अधिकरी आनंद पाटील यांनी या पंधरवड्या निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. प्रमुख अतिथींच्या हस्ते यावेळी काढण्यात आलेल्या हेल्मेट सुरक्षा रॅलीतील सहभागी वाहन चालकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
                कार्यक्रमास कंळबोली परिसरातील नागरीक, वाहन चालक मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परिवहन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री.पाटील यांनी केले.
बाईक रॅलीचे आयोजन
            पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पनवेल, कंळबोली, खारघर परिसरातील नागरीकांच्या जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा पंधरवड्याच्या सांगता समारोह निमित्ताने भव्य अशा मोटार बाईक रॅलीचे आयोजन करुन हेल्मेट व रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात आली.  या रॅलीस कळंबोली वाहतूक विभागाचे उपायुक्त नितीन पवार, तहसिलदार दिपक आकडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. कळंबोली आरटीओ कार्यालया पासून सुरुवात झालेली रॅली खांदा कॉलनी, पनवेल एस.टी. स्टँड, शिवाजी चौक, कामोठे, खारघर, शिल्प चौक, उत्सव चौक मार्गे कळंबोली आरटीओ कार्यालय असा होता. या रॅलीच्या आयोजनासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक