प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न

दिनांक :-26 जानेवारी 2017                                                                         वृत्त क्र.57
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न
        अलिबाग दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 67 वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग येथील पोलीस परेड ग्राऊंडवर जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. अविनाश गोटे, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
             जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रसंगी प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांच्या संघटीत प्रयत्नाने आपले भारतीय प्रजासत्ताक अधिक सक्षम होईल अशी आशा व्यक्त केली.
            यानंतर पोलीस पथक, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस पथक, जिल्हा वाहतुक शाखा पोलीस पथक, होमगार्ड पथक पुरुष व महिला, जा.र.ह. कन्याशाळा आरएसपी, स्काऊट गाईड, पोलीस वाद्यवृंद पथक, दामिनी पथक, बीट मार्शल, बाँबशोधक व नाशक पथक, फॉरेन्सीक लॅब पथक, अग्निशामक दल  नगरपरिषद, या सर्व पथकांनी जिल्हाधिकाऱ्यांना व उपस्थितांना संचलनाव्दारे मानवंदना दिली. 
पुरस्कारार्थींचा सत्कार
            ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील विविध पुरस्कारार्थींचा जिल्हाधिकाऱ्यांचे  हस्ते सत्कार करण्यात आला. यात गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक विजेते सावता महादेव शिंदे, पोलीस निरिक्षक, खोपोली पोलीस स्टेशन, मोहन पोशा मोरे, सायबर सेल, पोलीस अधिक्षक कार्यालय, रायगड,  पांडूरंग शंकर खेडकर, पोलीस हवालदार, रोहा पोलीस ठाणे तसेच  नेहरु युवा केंद्र, रायगडच्या वतीने रायगड जिल्हयातील सर्वोत्कृष्ट कार्य करणारे युवा मंडळ-स्वर्गीय संगीता मच्छिंद्र ठाकूर फाऊंडेशन, धुतुम, उरण या युवा मंडळाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फतही गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.यात विशेष प्राविण्य मिळविलेल्या कु.सुप्रिया संजय हंडाळ ही रायगड जिल्हयातील विद्यार्थींनी 97.60 टक्के गुण मिळवून मुंबई मंडळातून प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाली असल्याने तिला रु. 1 लाख चा धनादेश व प्रशस्तीपत्रक व कु.अवणी उदय गायकवाड, ही विद्यार्थीनी मुंबई शिक्षण मंडळात गुणवत्ता यादीत 96.20 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने तिला रु. 50 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
            तसेच उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग रायगड अलिबाग यांच्या राष्ट्रीय हरित सेना योजना अंतर्गत उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये  विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा व त्यांच्यामध्ये पर्यावरणा विषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी  उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा सन्मान करण्यात आला. यात प्रथम क्रमांक कु.प्रसाद पां. तांडेल, प्रायव्हेट ज्युनिअर कॉलेज, पेण, व्दितीय क्रमांक शारदा विद्यामंदिर पेडली ता.सुधागड, कुमारी ऋतुजा राजे गोळे, तृतीय क्रमांक जयकिसान विद्यामंदिर आणि उच्च माध्यमिक शाळा वडखळ ता.पेण.यांचा समावेश होता.
            तसेच प्रिझम सामाजिक संस्थेतर्फे मतदार जनजागृतीपर पथनाटय उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. या समारंभास स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी, मा.जिल्हा न्यायाधीश, उपनगराध्यक्षा ॲड.श्रीमती मानसी म्हात्रे, जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रसाद पाटील, विविध विद्यालयांतील विद्यार्थी, नागरिक, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक