मराठी भाषा संवर्धनासाठी साहित्यिकांचे प्रभावी योगदान -- मराठी भाषा तज्ञ अनंत देवघरकर

दिनांक:- 27/02/2017                                                                                            वृत्त क्र. 104
मराठी भाषा संवर्धनासाठी
 साहित्यिकांचे प्रभावी योगदान
                                                              -- मराठी भाषा तज्ञ अनंत देवघरकर


अलिबाग, दि.27(जिमाका) :- मराठी भाषेची महती मोठी असून मराठी भाषा संवर्धनासाठी आपल्या साहित्यिकांनी दिलेले योगदान खूप मोठे व प्रभावी आहे.  ज्यांना आपण अष्टपैलू, साहित्यिक म्हणतो त्या सर्वांनी मराठी भाषेसाठी केलेली साहित्याची निर्मिती ही अभूतपूर्व आहे.  अशा मराठीचे जतन करणे, तिचे संवर्धन करणे हे काम प्रत्येक मराठी माणसाचे असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा तज्ज्ञ अनंत देवघरकर यांनी आज येथे केले.   अलिबाग राज्य परिवहन महामंडळामार्फत  आयोजित केलेल्या मराठी भाषा दिन कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, दैनिक लोकमतचे उपसंपादक जयंत धुळप, अलिबागचे एसटी आगार व्यवस्थापक गजानन पाटील, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे  बोलताना श्री. देवघकर म्हणाले की, मराठी भाषेचा ठेवा सर्वदूर आहे. घराघरात मराठीचा संवाद वाढला पाहिजे. शासनाने सुरु केलेला मराठी भाषा दिनाचा उपक्रम म्हणजे मराठीला अधिकाधिक महती देऊन तिचे संवर्धन करणारा स्तुत्य उपक्रम आहे.  सर्वांना मराठी भाषेचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी भाषेत असंख्य ग्रंथ, काव्य, कविता असे विपुल प्रमाणातील लेखन आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा.  आपल्या मराठी भाषेचा ठेवा सर्वसामान्यांपर्यंत जावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त करुन मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
         प्रमुख पाहुणे  म्हणून  दैनिक लोकमतचे कोकण विभाग प्रमुख जयंत धुळप मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मराठी भाषा ही संवादाची भाषा आहे. एसटी माध्यमातून हजारो, लाखो लोकांपर्यंत या भाषेतील संवाद साधण्याचे काम एस.टी. महामंडळ करीत आहे अशा प्रकारचा उपक्रम एस.टी. आगारात व्हावा हेच या कार्यक्रमाचे वैशिष्टय आहे.  आज राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर बुकस्टॉल आहेत.  त्या ठिकाणाहून वृत्तपत्र असो की, पुस्तके, मासिके असो  त्या माध्यमातून मराठी साहित्याचा प्रसार होतोच.  तिथे स्पर्धा परीक्षेला शासनाची इतर प्रकाशने देखील ठेवावीत अशी सूचना त्यांनी यावेळी केली  व  मराठी भाषा  दिनानिमित्त  सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.  
            यावेळी संवाद साधतांना जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.   संपूर्णपणे मराठी बोलताना आपण कळत न कळत इंग्रजी शब्दाचा सहजतेने वापर करुन मराठीवर प्रभुत्व असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतो.  अर्थातच इंग्रजीचा बराचसा पगडा आपल्यावर असतो.   काही अंशी तो खराही असतो. असे असले तरी आपली मराठी भाषा ही देशातील पहिल्या पाच जास्त बोलणाऱ्या भाषेत आहे.  तिचा अधिकाधिक विकास करण्यासाठी मराठी साहित्याचे वाचन करावे.  सोशल मिडियाचा वापर करतानाही मराठीचाच वापर वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.  पुस्तकांच्या वाचनासाठी एस.टी. महामंडळाचा प्रवास हा उपयुक्त ठरु शकतो त्याचाही लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
प्रास्ताविक करतांना आगार व्यवस्थापक गजानन पाटील म्हणाले की, मराठी भाषेच्या महतीचे सर्व श्रेय संत,कवी व लेखकांचे आहे. जगातील सर्व भाषांतून मराठी भाषेला 15 वा नंबर लागतो. ही देखील आनंदाची बाब आहे.  मराठी साहित्याची महती सांगताना त्यांनी  शामची आईचे उदाहरण देऊन हे पुस्तक वाचताना आपणास  दुसरी ज्ञानेश्वरी वाचल्याचा आनंद मिळतो असे सांगितले.  आमची मराठी भाषा आमच्या आईसारखीच गोड आहे. आपल्या साहित्यिकांनी मराठी भाषेला प्रगल्भ करण्याचे काम केले आहे. तिला अधिक वाढविण्याचे काम आपणास करावयाचे आहे असे सांगून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितल्याबद्दल राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे आभार  व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रसन्ना पाटील यांनी केले. या कार्यक्रमास अलिबाग एस.टी.आगारातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीक व प्रवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

                                               000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत