प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त -- केंद्रीय मंत्री अनंत गीते

प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना
रायगड जिल्हयासाठी उपयुक्त
                                    --  केंद्रीय मंत्री अनंत गीते

             अलिबाग दि. 16 (जिमाका):-  युवकांना रोजगार व स्वयंरोजगार करता यावा. नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी  प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त असून ही योजना प्रभावीपणे राबवून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी अशा सूचना केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी आज येथे दिल्या.
केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत इतर विषयांबरोबरच मुद्रा योजनेचा आढावा घेऊन  मार्गदर्शन करतांना मंत्रीमहोदय बोलत होते.
रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा जिल्हा असल्याने मुद्रा योजनेचा लाभ घेऊन अनेक तरुणांना त्यांच्या आवडीनुसार व सोयीनुसार रोजगार व स्वयंरोजगार करता येणार आहे. त्यांना रोजगार मिळण्याबरोबरच येथे येणाऱ्या पर्यटकांचीसुध्दा सोय होऊन पर्यटनाला  अधिक चालना मिळेल.असे सांगून ते पुढे म्हणाले की, जिल्हयात आतापर्यंत 14 हजार 500 लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयात ही योजना उत्तम प्रकारे राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा यासाठी उपस्थित सर्व सभापती, उपसभापती यांनी आपआपल्या  क्षेत्रात या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करावेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यावेळी म्हणाल्या की, या योजने अंतर्गत शिशू ,किशोर,तरुण अशा तीन प्रकारात कर्ज राष्ट्रीयकृत बँकांमार्फत देण्यात येते. कर्ज मिळविणे ही अतिशय सुलभ प्रक्रिया आहे. कुठलाही प्रकारचा छोटा व्यवसाय करण्यासाठी या अंतर्गत कर्ज देण्यात येते.
                                   0000000



Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत