कृषि विभागाचा उपक्रम पीक कापणी प्रयोग व मोबाईल ॲपचे प्रशिक्षण


अलिबाग दि.16 (जिमाका)-  जिल्ह्यात खरीप हंगामात भात व नागली पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होत असते. या पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी घेण्यात येणारा पीक कापणी प्रयोग व त्यासाठी वापरावयाच्या मोबाईल ॲपचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले.
रायगड जिल्ह्यात भात व नागली पिकांचे अनुक्रमे 1,23,000 व 10,500 हे क्षेत्रावर लागवड केली जाते. दरवर्षी खरीप हंगामात कृषि विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रमुख पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज व आढावा काढण्याचे प्रयोग (पीक कापणी प्रयोग), त्या करीता वापरात येणाऱ्या मोबाईल ॲप तसेच पंतप्रधान पीक विमा योजना सन 2017-18 करीता राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विमा हप्ता व विमा अर्ज स्विकारण्यासाठी अधिमान्यता दिलेल्या आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटर या तीन मुद्यांबाबत प्रशिक्षण नुकतेच (दि.11 व 12 रोजी) राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे पार पडले.
यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पी.डी.शिगेदार उपस्थित होते.  या प्रशिक्षणात कृषि, महसूल विभागाचे तसेच जिल्हा परिषदेचे क्षेत्रिय व पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.
 दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात पहिल्या दिवशी भात व नागली या प्रमुख पिकांकरीता निवडण्यात आलेल्या अनुक्रम 162 व 72 गावांना आवश्यक असणाऱ्या छापील कोऱ्या तक्त्यांचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी प्रयोगाकरीता निवडलेल्या गावांत प्रत्यक्ष क्षेत्रिय स्तरावर अवलंबविण्याची  कार्यपध्दती तसेच सर्वे नं, पोट हिस्सा निवड, शेताची निवड,प्लॉट आखणी, उत्पन्नाचे मोजमाप इ. या करीता वापरावयाचे मोबाईल ॲप इ. विषयी प्रशिक्षण देण्यात आले.
पीक कापणी प्रयोग
पिकांच्या उत्पन्नाची आकडेवारी राज्य तसेच केंद्र शासनास अनेक मुलभुत आणि धोरणविषयक बाबीसाठी आवश्यक असते. सन 1945 पुर्वी पिकांच्या उत्पन्नाचे अंदाज आणेवारी पध्दतीवर आधारीत होते. या पध्दतीत वैयक्तिक निर्णय  व स्थानिक परिस्थिती यांचा परिणाम होत असल्यामुळे वस्तुनिष्ठ अंदाज मिळणे शक्य होत नव्हते. 1944-45 साली मात्र कुलाबा जिल्हयात भात पिकावर प्रथमच रँडम पद्धतीच्या तत्वांचा वापर करुन पिकांच्या सरासरी उत्पन्नाचा अंदाज काढण्यासाठी मार्गदर्शक योजना सुरु करण्यात आली. अशा पध्दतीने काढलेले अंदाज वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह असल्यामुळे पिकांच्या उत्पन्नाचे अंदाज काढण्याची ही पध्दत हळुहळु सर्व पिकांसाठी राज्यात लागु केल्याचे सांगण्यात आले.
प्रधानमंत्री पीक विमा योजना व मोबाईल ॲप
पीक सर्वेक्षण योजनेतंर्गत घेण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी राज्य, देशपातळीतील अन्नधान्याच्या उत्पन्नाचे अंदाज काढण्यासाठी तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी वापरण्यात येत असुन पैसेवारी काढण्यासाठीचे प्रमाण उत्पन्न तयार करण्यासाठीही याच आकडेवारीचा उपयोग होत असल्यामुळे सदर आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे. त्याकरीता पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी विश्वासार्ह व अचुक, आधुनिक पध्दतीने प्राप्त होणेसाठी मागील वर्षापासुन (सन 2016-17) पासुन केंद्र - राज्य सरकारने ॲन्ड्रॉइड मोबाईल आधारीत सॉफ्टवेअर प्रणाली सर्व क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी वापरावयाची असुन या पध्दतीव्दारे उत्पन्नाची अचुक आकडेवारी, प्लॉट कापणी-आखणी तसेच ग्रामस्तरावरील समितीचे फोटो राज्य शासनास तसेच विमा कंपनीस नुकसान भरपाई ठरविण्यास उपलब्ध होणार आहेत.
 मोबाईल ॲप विषयी तांत्रिक बाबींचे  सविस्तर प्रशिक्षण सर्व उपस्थितांस देण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2017-18 करीता रायगड जिल्ह्यात भात व नागली पीकांसाठी राबविण्यात येत असुन, कर्जदार शेतकऱ्यास बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यास ऐच्छिक असुन शेतकऱ्यांनी भात व नागली पीका करीता रक्कम रु. 780 व 400 रु. विमा हप्ता व विमा अर्ज आपल्या नजिकच्या बँकेत किंवा आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटर वर (CSC) 31 जुलै 2017 अखेर भरणेबाबत शेतकऱ्यांना आवाहन व मार्गदर्शन करण्याबाबतमार्गदर्शन करुन  कार्यपद्धतीबाबत आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटर रायगड जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती धुमाळ यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत