मागेल त्याला शेततळे: शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद;155 शेततळी पूर्ण
अलिबाग, दि.2,(जिमाका)- ' मागेल त्याला शेततळे' या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने किमान धारण क्षेत्राची अट शिथील केल्याने शेतकऱ्यांचा
प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचा
परिणाम म्हणून जिल्ह्यात 155 शेततळ्याचे काम पुर्ण झाले आहे.
या
संदर्भात कृषि विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी
तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित
कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यामतून जलसिंचनाची उपलिब्धता वाढविणे तसेच
संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी 'मागेल त्याला शेततळे' ही योजना
राबविण्यात येत आहे.
कोकण विभागातील भौगोलिक परिस्थिती व शेतकऱ्यांची
जमिनधारण क्षमता अत्यल्प असल्याने मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत 0.60 हेक्टर
किमान धारण क्षेत्राची अट शिथिल करुन ती 0.02 हेक्टर करण्यास दि. 20 मे रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये
मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील
जास्तीत जास्त् शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 733 अर्जांची
ऑनलाईन नोंदणी झाली आहे. तालुकास्तरीय समितीने छाननी करुन एकूण 275 अर्जांना मंजूरी
दिलेली असून तसे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. मान्यताप्राप्त कामांपैकी 30 जून,2017 अखेर 155
शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. रायगड जिल्ह्यासाठी एकूण 68 कोटी 48 लाख रुपयांचा
निधी प्राप्त झाला आहे. यातील निधी संबंधित
खातेदारांचे बँक खात्यावर आर.टी.जी.एस. ने जमा करण्यात येत आहे.
विशेषतः
उरण तालुक्यातील खार जमीनीमध्ये 'मागेल त्याला शेततळे' ही योजना अधिक फायदेशीर ठरली
आहे. तसेच उरण तालुक्यातील मोठी जुई या एकाच गावात 10 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली
आहेत. या शेततळ्यात शेतकऱ्यांनी मासे उत्पादन
सुरु केले आहे, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे.
शासनाने
'मागेल त्याला शेततळे' ही योजना सुरु केल्यामुळे संरक्षित व शाश्वत सिंचन सुविधा निर्माण
झाली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्न व उत्पादनात वाढ होऊन जीवनमान उंचावण्यास मदत झाली
आहे.
- संकलनः जिल्हा माहिती कार्यालय,
रायगड- अलिबाग
Comments
Post a Comment