जिल्ह्यातील रस्ते व पुलाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक संपन्न
अलिबाग दि. 10:- (जिमाका) जिल्ह्यातील
रस्ते व पुलाच्या सद्यस्थितीबाबतबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात दि. 8 ऑगस्ट 2017 रोजी बैठक संपन्न झाली.
या
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रा.जि.प.अलिबाग डॉ.अविनाश गोटे, जिल्हा पोलीस
अधिक्षक रायगड-अलिबाग अनिल पारसकर, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
पनवेल, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग विलास पाटील, महाड व्ही.आर.सातपुते,
व पनवेल आर.एस.मोरे, उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी पेण राजेंद्र मदणे व पनवेल लक्ष्मण दराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी सागर पाठक, जेएसडब्ल्यू, वेलस्पन, रिलायन्स कंपन्याचे प्रतिनिधी इत्यादी
अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये मान्सून
कालावधी व आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्ग व इतर प्रमुख
रस्त्यावरील खड्डे व धोकादायक पुलांच्या सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी
घेतला. आढाव्यानंतर दि.20 ऑगस्ट 2017 पूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील व इतर प्रमुख
रस्त्यावरील खड्डे भरुन रस्ता वाहतुकीस योग्य करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी
दिल्या. गणेशोत्सवामध्ये मोठयाप्रमाणात
भाविक कोकणातील गावी येत असल्याने वाहनांची प्रचंड संख्या असते. त्यामुळे अपघाताचे प्रमाणदेखील मोठया प्रमाणात
आहे. त्यामुळे अपघात प्रवण ठिकाणी तसेच
धोकादायक पुलाच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक तात्काळ लावण्यात यावे असे
निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
महामार्गाशेजारील ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव व
संपर्क क्रमांकाची माहिती महामार्गावरील फलकांवर लावावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून
मुंबई-गोवा महामार्गाची नियमित पाहणी करुन अपघात प्रवण ठिकाणी योग्य उपाय योजना
कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
000000
Comments
Post a Comment