शासनाच्या विविध योजना कातकरी समाजपर्यंत पोहचविणे आवश्यक - कोकण विभागीय आयुक्त –डॉ.जगदीश पाटील


              
अलिबाग दि 11 (जिमाका): कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी असलेल्या शासनाच्या कल्याणकारी विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोकण विभागाचे आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी आज येथे केले.  कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते  बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्र.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पी.डी.सिगेदार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार, अनुलोमचे लोकराज्य महाअभियानचे माहिती ज्ञान अधिकारी स्वानंद ओक, कोकण विभागाचे प्रमुख सदाशिव चव्हाण रायगडचे प्रमुख रविंद्र पाटील  आदि उपस्थित होते.
  यावेळी मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, कृषी विभाग, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक,  अशा चार जणांची काही पथके यासाठी तयार करण्यात आली आहेत.   ही पथके प्रत्यक्ष कातकरी  कुटुंबाना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतील.   भात काढणी झाल्यानंतर बरेच कातकरी स्थलांतरित होतात, यानंतर किती कातकरींना कोणते लाभ द्यायचे याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येइल.   आदिवसींच्या जन्माची नोंद नसल्याने तसेच इतर आवश्यक नोंदींअभावी त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही हे लक्षात घेऊन त्यांची ओळख दर्शविणारी कागदपत्रे तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय या समाजातील सर्व वयोगटातील लोकांना कौशल्य विकास किंवा त्या स्वरूपाचे योग्य ते प्रशिक्षण देऊन रोजगार संधी उपलब्ध करून देणे, उद्योजकता विकासाच्या माध्यमातून त्यांच्या अर्थार्जनाची चांगली सोय करणे हा देखील या मोहिमेचा उद्देश राहणार आहे असे सांगून विचारलेल्या शंकाचे निरसनही  त्यांनी यावेळी केले.
या समाजात वारंवार होणारे स्थलांतरण आणि व्यसन या देखील मोठ्या समस्या आहेत ते पाहता जनसेवकांनी या उपक्रमात मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे ते म्हणाले फलोत्पादन, पर्यटनावर देखील 
 विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे विशेष भर देण्यात येणार असून यामध्ये देखील अनुलोम संस्थेने सक्रीय सहभाग घ्यावा तसेच शासकीय योजना व कार्यक्रमांची माहिती जास्तीत जास्त तळागाळातील लाभार्थींना मिळवून द्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी पी.डी.शिगेदार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी अनुक्रमे फलोत्पादन आणि प्रादेशिक पर्यटन आराखड्यावर सादरीकरण केले. अनुलोमचे स्वानंद ओक यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली.
000000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत