निर्मल सागरतट अभियान: पर्यटकांची सुरक्षा व सुविधेस प्राधान्य- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

अलिबाग, दि.13 ( जिमाका)-  रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांचा पर्यटन विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करुन जिल्ह्याचा विकास करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सेवा सुविधांचा विकास करतांना पर्यटकांची सुरक्षा व त्यांची सुविधा या गोष्टींना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
जिल्ह्याच्या सागरतट  व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल सागरतट अभियानाच्या अंमल्बजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे,  महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे एशियन डेव्हल्पमेंट बॅंकेचे उपसंचालक समन्वयक जितेंद्र रायसिंघानी,  प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन  सुरज नाईक,  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे  प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण,  बंदर अधिक्षक अरविंद सोनवणे, रोहयो उपजिल्हाधिकारी पी.एस. जैतू, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच सर्व किनारा विकास अधिकारी व  ज्या दहा गावांत निर्मल सागरतट अभियान राबविले जात आहे त्या गावांचे सरपंच व ग्रामसेवक आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, सागर तटावर पर्यटन सुविधा विकासासाठी जिल्ह्यातील  नागाव पिरवाडी ता. उरण, मिळकतखार, आवास,  किहिम, आक्शी, नागाव, रेवदंडा ता. अलिबाग,काशिद ता. मुरुड आणि दिवेआगार व हरिहरेश्वर ता. श्रीवर्धन या गावांना निधी देण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, पर्यट्कांना सुविधा देतांना त्या त्यांच्यादृष्टीकोनातून महत्त्वाच्या असल्या पाहिजे याचा विचार व्हावा.  पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या जीवरक्षकांना  पगार देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून निधी उभारावा.  गावांच्या पायाभूत सुविधा विकासासाठी विविध विभागांनी समन्वयातून  प्रस्ताव तयार करावे. उदा. गावातील अन्य विकासाची कामे रोहयो मधून करता येतील. तसेच शाश्वत समुद्र किनारा विकास व्यवस्थापनातून जिल्ह्यातील काशिद या समुद्र किनाऱ्याचा विकास करण्यात येत असून त्यास आयएसओ 13009 हे मानांकन मिळविण्यासाठी जिल्हाप्रशासन प्रयत्नशिल आहे. त्याच धर्तीवर  वरसोली व किहिम या बिचेसचाही विकास करण्याबाबत उपाययोजना होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
            जिल्हाधिकारी म्हणाले की, पर्यटकांसाठी सुविधा विकास करतांना शौचालये, चेंजिंग रुम्स,  सुरक्षा उपाययोजना या समान पद्धतीने व्हाव्यात यासाठी समान मॉडेल विकसित करण्याचा प्रयत्न करावा. गावांनी आपल्या गावातील लोकांचे व्यवसाय व उदरनिर्वाह हे जर पर्यटनावर अवलंबून असतील तर  त्याचा विचार करुन प्राधान्याने ही विकास कामे करावी, असे आवाहन केले. 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत